मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खोक्यांवरून वाद सुरु होता. या वादावर आता रवी राणा यांच्याकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रवी राणा यांनी चर्चा केली. त्यानतंर आता रवी राणांनी शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं. माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर, शब्द परत घेतो. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. परंतू, बच्चू कडू यांनीही आपले अपशब्द मागे घेतले पाहिजेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ‘सागर’ बंगल्यावर चर्चा केल्यानंतर रवी राणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “विचारांमध्ये मतभेद होत असतात. बच्च कडू आणि मी सरकारबरोबर आहे. महाराष्ट्रात जनेतच्या विकास, उन्नती आणि न्याय देण्यासाठी शिंदे-फडणवीस आलं आहे. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी काही विकास केला नाही, तो तीन महिन्यांत या सरकारने केला. त्यामुळे हा विषय मी संपवत आहे. माझ्या वक्तव्यानंतर मंत्री अथवा आमदार दुखावले असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो,” असे रवी राणांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा : शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांच्या दिलीगिरीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“एकनाथ शिंदे फडणवीस आमचे नेते आहेत. आपले वाद-विवाद अथवा आपण चुकलो तर, दुरुस्त करण्याचं काम नेत्याचं असते. बच्चू कडू यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते आपले अपशब्द मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. वादा-विवादामध्ये आम्हाला पडायचं नाही,” असेही रवी राणांनी स्पष्ट केलं.