राज्यातील सत्ताधारी पक्षांना समर्थन करणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर उद्धव ठाकरे गटाने ‘सामना’च्या माध्यमातून भाष्य करताना बंडखोर आमदार हे खोक्यांमुळेच ओळखले जाणार असं म्हटलं आहे. कडू आणि राणा यांच्यात झालेल्या वादाबरोबरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दारुसंदर्भात केलेल्या विधानावरुनही शिवसेनेनं सध्याच्या सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांचा समाचार घेतला आहे. कडू आणि राणा यांच्यातील वाद संपल्याचे दावे केले जात असले तरी त्यांच्यामध्ये धुसपूस सुरु असल्याचं शिवसेनेनं म्हटलं असून कितीही काहीही केलं तर खोकेवाले हा डाग पुसला जाणार नाही असं शिवसेनेनं म्हटलंय.

“सरकारला पाठिंबा देणारे दोन आमदार कडू आणि राणा यांच्यातील वाद संपला असे (उप)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावे लागले. फडणवीस यांच्यासमोर दोघांची कट्टी संपली व बट्टी झाली. त्यापाठोपाठ आमदार बच्चू कडू यांनीही ‘पहिली चूक’ म्हणून आमदार रवी राणा यांना माफी जाहीर केली. प्रहार पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना कडू यांनी राणा यांच्या आरोपाचे कडू घोट महप्रयासाने पचवले. कडू म्हणाले, ‘सत्ता गेली चुलीत! कोणीही येऊन काहीही बोलावं हे चालणार नाही. पहिली वेळ आहे म्हणून माफ करू, पण यापुढे अशी चूक केली तर ‘प्रहार’चा वार दाखवून देऊ.’ कडू यांचा हा इशारा जसा राणा यांना आहे तसाच तो सरकारलाही आहे. याचे धोके ठावूक असल्यानेच महाराष्ट्रात असंख्य प्रश्नांचा डोंगर असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या दोन आमदारांचा ‘राडा’ संपविण्यात काही दिवस खर्चावे लागले,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
MLA Rohit Pawar alleged that MLAs gave contracts in Municipal Corporation to their relatives
पिंपरी : चिंचवडमध्ये आमदारांच्या नातेवाइकांचा कंत्राटदार ‘पॅटर्न’; कोणी केला हा आरोप
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

“अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या किंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघांत भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते व गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही हिसका दाखवला व राणांची बरीच पोलखोल केली. ‘खोके’ आमदार म्हटल्यामुळे आपली अप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे आपण खोके घेतल्याचे पुरावे द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा, असा दम कडू यांनी भरला. अर्थात राणा यांच्या दिलगिरीनंतर अमरावतीमधील सभेत त्याच राणांना कडू यांनी पहिली वेळ म्हणून माफीही दिली. म्हणजे आधी मोठ्या आवेशात राणांचे बखोट धरले व नंतर ते सोडून दिले. तरी बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱ्यांचा कैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते. हे आता सहन करता येणार नाही,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखात आहे.

“राणा व कडू यांच्यातील वाद खोक्यांवरून निर्माण झाला, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता (उप)मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर राणा यांनी खोक्यांसंदर्भातले त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. त्यांनी दिलगिरी वगैरे व्यक्त केली, पण राणा यांनी हे शब्द मनापासून मागे घेतले काय ही शंकाच आहे. कारण रवी राणा यांनी बुधवारी पुन्हा ‘आम्हाला कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे’, अशी थेट धमकीच कडू यांना दिली. त्यावर कडू यांनीही ‘मी पाच तारखेला घरी आहे. त्यांनी मारायला यावं’ असा प्रतिइशारा दिला आहे. म्हणजे राणा-कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही असाच याचा अर्थ. अर्थात महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेच्या मनात ५० आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’ असेच म्हटले जाणार. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे. घटनेच्या पायावर ते उभे नसून प्रत्येकी पन्नास कोटींच्या खोक्यांवर ते उभे आहे. त्यामुळे त्यांच्यात एकजिनसीपणा नाही. नैतिकता आणि विचारांचे सूत्र नाही. महाराष्ट्राविषयी आस्था नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“मिंधे गटाचे एक मंत्री गुलाब पाटील यांनाही खोक्यांचा आरोप काट्यांप्रमाणे टोचला आहे व त्यांनीही खोक्यांचा आरोप करणाऱ्या राणा यांच्यावर डोळे वटारले. मात्र याच गुलाब पाटलांवर त्यांच्याच जिल्ह्यातील मिंधे आमदार चिमण पाटील यांनी हल्ला केला. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्याची इज्जत खुंटीला टांगून सरकार चालवले जात आहे,” असा टोलाही या लेखातून लगावला आहे.

“शेती मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर बीडच्या कलेक्टरला भर बैठकीत विचारले, ‘‘आपण दारू वगैरे पिता की नाही?’’ कलेक्टर यांनी सांगितले, ‘‘होय, आम्ही पितो अधूनमधून.’’ यावर सत्तारांच्या मागून कुणी तरी जिभेची टाळी वाजवली- ‘‘आमचे साहेब दारू पित नाहीत, पण खोके घेतात!’’ असा एकंदरीत महाराष्ट्राच्या इज्जतीचा खेळखंडोबा जागोजाग सुरू आहे. राज्याच्या प्रश्नांवर ना मुख्यमंत्री बोलतात ना त्यांचे वाचाळ मंत्री,” असं शिवसेनेनं सत्तार यांच्या प्रकरणाचा संदर्भ देत म्हटलं आहे.

“मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण कोणतेही खोके दिसले की लोकांना पन्नास बेइमान आमदारांचीच आठवण होणार. या बेइमानांच्या राजकीय चिताही खोके रचून पेटविल्या जातील असा संताप लोकांत खदखदत आहे. आज तुम्ही एका राणांना समजावले, पण अमरावती व राज्याच्या जनतेला कसे समजावणार? आणि किती लोकांवर बदनामीचे खटले दाखल करणार? ‘खोक्यांचा आरोप मी कदापि सहन करणार नाही’, असे बच्चू कडू यांनी तळमळून सांगितले. कडू यांनी अपंगांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले, पण एकदा गुवाहटीला गेल्याने त्या कामावर बदनामीचे ‘खोके’ पडले,” असा शाब्दिक चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

“रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?” असं सूचक विधान शिवसेनेनं केलं आहे.