स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. १२ फेब्रुवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांच्या वेशात येत स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. पण, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या आंदोलनाला नौटंकी म्हटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलनं केली. पण, हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली होती. त्यांच्या विधानाचा आता रविकांत तुपकर यांनी समाचार घेतला आहे.

हेही वाचा : “म्हणून मला तुरुंगात टाकू शकले नाहीत”; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, “मी ५ वर्ष…”

जामीनावर सुटका झाल्यानंतर रविकांत तुपकरांनी नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना रविकांत तुपाकर म्हणाले, “पोलिसांना ज्यांनी आमच्या अंगावर पाठवलं, त्यांच्या खुर्च्या येणाऱ्या काळात काढून घेतल्याशिवाय राहणार नाही; हा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. खेटायचं असेल, रविकांत तुपकरशी मैदानात खेटावं. पोलिसांच्या आडून खेटू नये.”

“गुलाबराव पाटील आंदोलनाला नौटंकी म्हणत आहे. पण, गुलाबराव पाटीलांच्या भाषणात एक डायलॉग असतो, तो म्हणजे, ‘कतलीया कही कात बदल लेते हे, पुण्य के आड मे पाप बदलते है, पर कई लोग अपने बाप बदल लेते है’ अन् गुलाबराव पाटील गुवाहाटीला गेले. ते सांगतात मी नौटंकी आहे. मग गुवाहाटीला काय शेण खायला गेले होते का?,” असा खोचक सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला.

हेही वाचा : “गिरीश बापटांनी कसब्याचा गड मजबूत केला, त्यांचा शब्द…”, देवेंद्र फडणवीस व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले…

“विरोधी पक्षात असताना गुलाबराव पाटील यांनीही आंदोलन केली. पान टपरी चालवत असताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केली. त्यांच्याशी तुम्ही बेईमानी आणि गद्दारी केली. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दुसरों के घरो पर पत्थर नहीं फेका करते’. तुम्ही ठाकरे घराण्याचे झाले नाही, तुम्ही आम्हाला शिकवता का? योग्यवेळी गुलाबराव पाटलांना उत्तर देणार,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravikant tupkar reply gulabrao patil over comment agitation nautanki ssa