लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. आता हा निकाल समोर यायला अवघे काही तास बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले. यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला १५० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवलेला आहे. तर इंडिया आघाडीने २९५ जागा येण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे.
असे असताना लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या बारामती मतदारसंघात काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बारामती मतदारसंघाबाबत मोठ भाष्य केलं आहे. ‘उद्या बारामती कोणत्यातरी एका पवारांना पराभूत होताना पाहणार आहे’, असं विधान रवींद्र धंगेकर यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना केलं. रवींद्र धंगेकर यांच्या या विधानानंतर आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
“भाजपाला बहुमत मिळणं कठीण, कारण…”, ‘या’ राजकीय विश्लेषकाचं मत चर्चेत
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
“उद्या कुठले पवार पराभूत होणार यामध्ये रस नाही. मात्र, कोणतेतरी एक पवार पराभूत होताना उद्या महाराष्ट्र पाहणार आहे. त्याचं दु:ख माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे. शेवटी शरद पवारांनी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. शेतकऱ्यांपासून ते आयटी क्षेत्रापर्यंत त्यांची काम केलं. महाराष्ट्राने पवारांना कधी पराभूत होताना पाहिलं नाही. अजित पवार यांनीही शरद पवार यांच्या आशीर्वादाने राजकारण केलं. शेवटी शरद पवारांनीच लावलेलं ते झाड आहे. ते झाड कोणीही असूद्या. पण उद्या कोणतेतरी एक पवार पराभूत होतील याचं दु:ख आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
बारामती मतदारसंघ होता चर्चेत
बारामती लोकसभा मतदारसंघ या लोकसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत राहिला. कारण या मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या आमनेसामने आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे बारामतीचं राजकीय वातावरण या निवडणुकीत चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे उद्या निकाल असून बारामतीचा निकाल काय लागणार? याकडे अवध्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.
महाराष्ट्रात एक्झिट पोलचा अंदाज काय?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. १८ जागांवर भाजपा, शिवसेना ठाकरे गटाला १४ जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ तर काँग्रेसला ५ जागा, शिंदे गटाला ४ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज विविध एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचंही म्हटलं आहे. तसेच एक जागा अपक्षाला मिळणार असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? महायुतीला जास्त जागा मिळतात की महाविकास आघाडीला मिलतात, हे उद्या स्पष्ट होणार आहे.