Nana Patole on Ravindra Dhangekar: अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या बालेकिल्ल्यात जोरदार विजय मिळवून राज्यभरात चर्चेत आलेले रवींद्र धंगेकर हे काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावा लागल्यानंतर आता धंगेकर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. पुणे दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना धंगेकर पक्ष सोडणार आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पटोले म्हणाले, “राजकारणात काही लोक व्यावसायिक असतात. सत्ता जिथे असेल त्याबाजूने वागणारे काही लोक असतात. त्यामुळे यावर आज काही प्रतिक्रिया देणार नाही. पण महाराष्ट्रात जनमत हे काँग्रेसच्या बाजूने आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या पापामुळे जनतेच्या मतदानावर दरोडा टाकला गेला. सामान्य लोकांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार अपेक्षित आहे. त्यामुळे कुणी काय निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार बहुमतात येईल, असे मला वाटते.”
यावेळी नाना पटोले यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मी व्यक्तिगत कुणा एकाला बोलत नाही किंवा मी कुणाचेही नाव घेणार नाही. पण सत्तेवल आलेले सरकार हे फसवणुकीतून आलेले आहे, एवढेच सांगेन, असेही ते म्हणाले.
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात कसब्याचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र भाजपचे उमेदवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीसाठी उभे होते. मात्र यावेळी हेमंत रासने यांचा विजय झाला. मूळचे शिवसैनिक असलेल्या धंगेकर महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते. महापालिका निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत धंगेकर काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचे स्वरुप सांगितले. तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज लागली.