Ravindr Dhangkar on Shiv sena : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. यामध्ये काँग्रेस पक्षालाही फारसं यश निवडणुकीत मिळालं नाही. यातच आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, असं असतानाच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याच्या चर्चा आहेत. काही माजी आमदार आणि काही पदाधिकारी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. रविंद्र धंगेकर हे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, या चर्चानंतर माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे, असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तसेच आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, असंही रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

रविंद्र धंगेकर काय म्हणाले?

“माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरुप सांगितलं, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज लागली”, असं स्पष्टीकरण रविंद्र धंगेकर यांनी दिलं आहे.

पुढे काही वेगळी वाटचाल असणार का?

काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे काही वेगळी वाटचाल असणार का? असा प्रश्न धंगेकर यांना विचारला असता ते म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात आहे, काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे. काँग्रेस पक्ष जे सांगेल ते मी काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहणार आहे. शिवसेनेत (शिंदे गट) जाण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही. वैयक्तिक कामानिमित्त भेटलो, कामाच्या संदर्भानेच चर्चा झाली, बाकी काही नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे आणि वैयक्तिक कामाला कोणी कोणाला भेटू नये असं कोणी म्हटलेलं नाही. सर्वजण एकमेकांना भेटतात मग मी भेटलं त्यात गैर काय?”, असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

रविंद्र धंगेकरांच्या भेटीबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “रविंद्र धंगेकर हे त्यांच्या कामानिमित्त भेटीला आले होते. ” मात्र, दुसऱ्या पक्षातील काही जणांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत, असं विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, “आता पक्ष प्रवेश सुरु आहेत, लोक पक्षात येत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत”, अशी सूचक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.