Ravindra Dhangekar Political Journey : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते येत्या काही दिवसांत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी ते उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. धंगेकरांनी काँग्रेस सोडल्यामुळे पुणे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र काँग्रेसला मोठी गळती लागली होती. त्या काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा व शिवसेनेत सहभागी झाले होते. मात्र, धंगेकरांनी जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. मात्र आता त्यांच्या जाण्याने पुण्यात काँग्रेसकडे मोठं नेतृत्व राहिलेलं दिसत नाही.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे २०२३ मध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ११ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यांनी आमदार म्हणून कसबा पेठसह पुण्यातील अनेक सामाजिक प्रश्न मांडत लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मागील काही वर्षांपासून त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसची बाजू लावून धरली होती. मात्र आता त्यांच्या जाण्याने पुण्यात काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज भासणार आहे.
रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक असून आता ते स्वगृही परतणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. १९९७ ते २००२ मध्ये त्यांची बहीण वंदना धंगेकर आणि त्यानंतर २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेमध्ये सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. २००२ मध्ये धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
मनसेच्या तिकीटावर दोन वेळा नगरसेवक, विधानसभेला गिरीष बापटांना टक्कर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर, रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत आणि राज ठाकरे यांना साथ देत मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या २००७ आणि २०१२ मधील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत धंगेकर हे मनसेच्या तिकिटावर मोठ्या मतफरकाने निवडून आले होते. याच काळात त्यांनी २००९ व २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपा उमेदवार व तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती.
२०१७ मध्ये राज ठाकरेंची साथ सोडत काँग्रेस प्रवेश
रवींद्र धंगेकर यांनी २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्याही निवडणुकीत ते प्रचंड मतांनी जिंकले. धंगेकरांनी त्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. ही निवडणुक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. देवेंद्र फडणवीस यांचे अंत्यत विश्वासू सहकारी म्हणून गणेश बिडकर यांची ओळख होती. बिडकरांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी देखील ताकद लावली होती. मात्र धंगेकरांनी बिडकरांचा पराभव केला.
२०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव
दरम्यान, २०२४ मध्ये धंगेकरांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला होता. मोहोळ यांना ५.९४ लाख मतं मिळाली होती. तर धंगेकरांना ४.६१ हजार मतं मिळाली होती. त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना भाजपा उमेदवार हेमंत रासणे यांनी १९ हजार मतांनी पराभूत केलं.