Ravindra Dhangekar on Sanjay Raut Claims about BJP : “कसबा पेठ येथील भूखंडावरून भाजपाकडून त्रास होतोय, मात्र त्या कारणामुळे मी काँग्रेस सोडली नाही”, अशा शब्दांत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच धंगेकर म्हणाले, “संजय राऊत माझ्यासाठी बोलले असतील किंवा त्यांनी माझी बाजू मांडली असेल.” रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (१० मार्च) काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत (शिंदे) जाहीर प्रवेश केला आहे. “भाजपाच्या त्रासामुळेच धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेनेत गेले”, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर धंगेकर यांनी भाष्य केलं आहे. धंगेकर म्हणाले, “भाजपाच्या त्रासाला मी शून्य टक्के देखील घाबरत नाही.”
माजी आमदार धंगेकर म्हणाले, “कसबा पेठेतील ती जागा मी घेतली असती तर मुस्लीम समुदायाला दुःख झालं असतं. परंतु, इथे दुःख भाजपा नेत्यांना होतंय. म्हणून ते वक्फ बोर्डाला पुढे करत आहेत. मात्र त्या वक्फ बोर्डाच्या प्रक्रियेत स्थगिती मिळाली आहे. आम्ही ते प्रकरण उच्च न्यायालयात नेल्यानंतर तिथे आम्हाला स्थगिती मिळाली.आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबवली होती. मी भाजपाच्या त्रासाला शून्य टक्के देखील घाबरत नाही. तो विषय सात-आठ महिन्यांपासून चालू आहे.”
संजय राऊत यांच्या दाव्यंवर रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकर
शिवसेना प्रवेशानंतर धंगेकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की संजय राऊत यांच्या दाव्याप्रमाणे तुम्ही भाजपाच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडला का? त्यावर धंगेकर म्हणाले, “नाही, त्या लोकांनी माझ्या पत्नीला अटक करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र आम्ही घाबरत नाही.” भाजपाने तुमची कोंडी केल्यामुळे तुम्ही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. त्यावर काय सांगाल असा प्रश्न विचारल्यावर धंगेकर म्हणाले, “ते संजय राऊत यांचं मत आहे. ते माझ्यासाठी बोलले असतील. किंवा त्यांनी माझी बाजू मांडली असेल. परंतु, ते त्यांचं मत आहे. मी घाबरलो नाही. मी स्पष्ट सांगितलं आहे की आमची चूक असेल तर खुशाल आम्हाला तुरुंगात टाका. परंतु, मी कधी चुकीचं काम केलंच नाही. त्यामुळे मला भिती वाटत नाही.”