श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील जवान रवींद्र ऊर्फ दुरदुंडी इराप्पा कंकणवाडी (वय ४५) हे झाले. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता अपरगुंडी या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे. या आरळगुंडी गावात बुधवारी मुख्य यात्रेचा दिवस होता. पण कंकणवाडी हे शहीद झाल्याने ग्रामदेवी श्री वाकडादेवीची यात्रा रद्द करण्यात आली असून गावातील सर्व व्यवहार आज बंद होते. दरम्यान कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी कंकणवाडी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने दोन लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर करून आणखी मदतीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीनगर येथील सीमेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देणा-या लष्कराच्या तुकडीत कंकणवाडी यांचा समावेश होता. प्रत्युत्तर देत असताना कंकणवाडी यांच्या उजव्या बाजूच्या खांद्याला गोळी लागली. ती आरपार होऊन डाव्या बाजूने बाहेर पडली. यामध्ये ते शहीद झाले. ते श्रीनगरमध्ये १९ मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये नायक सुबेदार पदावर काम करीत होते. त्यांच्या मागे पत्नी सुवर्णा, वैष्णवी व भाग्यश्री या दोन मुली, मुलगा गौतम, वडील इराप्पा, आई काशव्वा, भाऊ डॉ. शशिकांत व बहीण असा परिवार आहे.
कंकणवाडी हे शेतकरी कुटुंबीय आहेत. रवींद्र यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. १९८८ मध्ये तेजत येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले. बेळगाव येथील मराठा लाईफ इंन्फट्रीमध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. भारताच्या गाजलेल्या शांती सेनेतून ते १९९० साली श्रीलंकेला गेले होते. आत्तापर्यंत त्यांनी त्रिवेंद्रपूरम, अरुणाचल प्रदेश, कारगिल, राजस्थान, अमृतसर आदी ठिकाणी सेवा केली आहे. अलीकडेच त्यांना नायक सुबेदार पदावर बढती मिळाली होती.
सोमवारी रात्री कंकणवाडी शहीद झाल्यानंतर मंगळवारी त्यांचे पार्थिव सैन्यदलाच्या ताब्यात मिळाले. बुधवारी रात्रीपर्यंत पार्थिव पुण्यात येणार आहे. तेथून कोल्हापूर आणि कोल्हापुरातून गुरुवारी सकाळी अरळगुंडी येथे आणण्यात येणार आहे. अरळगुंडी गावाबाहेर काही अंतरावर शेतामध्ये कंकणवाडी यांचे कुटुंबीय राहतात. घरासमोरच सकाळी साडेसात वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून अभिवादन केले जाणार आहे. गावात सुशोभित केलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
गडहिंग्लजचे रवींद्र कंकणवाडी अतिरेक्यांच्या हल्ल्यात हुतात्मा
श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील जवान रवींद्र ऊर्फ दुरदुंडी इराप्पा कंकणवाडी (वय ४५) हे झाले. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता अपरगुंडी या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे
First published on: 10-04-2014 at 04:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra kankanwadi of gadhinglaj martyr in terrorist attack