उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत १० मार्च रोजी जाहीर प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पक्षप्रवेशादरम्यान वायकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णयांत बदल करावा लागतो. त्यामुळेच मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे वायकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“रस्त्याच्या कामांसाठी मला १७३ कोटी रुपये हवे आहेत”

“गेली ५० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. १९७४ सालची जोगेश्वरीच्या पहिल्या दंगलीपासून मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करतोय. पडेल ते काम मी केलेले आहे. चार वेळा नगरेसवक, चार वेळा स्थायी समितीचं अध्यक्षपद, तीन वेळा आमदार झालो. मात्र मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण वेगळं आहे. करोना काळात आपली काहीही कामं झालेली नाहीत. आरेतील ४५ किलोमीटर रस्त्याच्या कामांसाठी मला १७३ कोटी रुपये हवे आहेत. लोक रडत आहेत. आमच्याकडचे रस्ते होणे गरजेचे आहे, असे लोक सांगत आहेत. अशा वेळेला लोकांसाठी धोरणात्मक निर्णय होणं हे प्रामुख्याने गरजेचं असतं. असे निर्णय बदलले नाहीत तर आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही” असे वायकर म्हणाले.

“….तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही”

“सत्तेत असल्याशिवाय धोरणात्मक निर्णय होऊ शकत नाहीत. लोक आपल्याला निवडून का देतात. लोकप्रतिनिधींनी सामान्यांच्या समस्यांवर काम करावे, असे लोकांचे मत असते. याच कारणामुळे निर्णय बदलणे हे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. देशात ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे विधानसभेत वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी आज शिंदेंच्या शिवसेनेत आलो आहे. हे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही,” असे वायकर यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “रविंद्र वायकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचार जोपासणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. गेली ४० ते ५० वर्षे बाळासाहेबांसोबत त्यांनी शिवसेनेचे काम केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेच शिवसेनेचं काम करतोय. बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यभरात पोहोचवण्याचे काम आपण करतोय. मी पूर्ण वायकर कुटुंबाचे स्वागत करतो. वायकर यांनी मला त्यांच्या मतदारसंघातील समस्या सांगितल्या आहेत,” असे शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra waikar first comment after joining eknath shinde shivsena prd