महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेली वाशिष्टी नदी कोयना प्रकल्प वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणाऱ्या ६७ टीएमसी अवजलावर वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व राखून आहे. मात्र हे अवजल मुंबईला वळवण्याच्या पालकमंत्री ना. रवींद्र वायकर यांच्या भूमिकेला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाठिंबा दिला असून पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांनी विरोध केला आहे. त्यामुळे एकूणच शिवसेनेच्याच या तीन मंत्र्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे. त्यातच पालकमंत्री जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचे सूर ‘मातोश्री’पर्यंत आळवले गेले असल्याचे समजते. त्यामुळे निमित्तमात्र ठरणारे कोयनेचे अवजल पालकमंत्र्यांच्या मुळावरच उठणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत मोदी लाट येऊनसुद्धा एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांनी रत्नागिरीत जाहीर सभा घेऊनदेखील शिवसेनेच्या भगव्यापुढे भाजपचा पुरता धुव्वा उडाला. आ. राजन साळवी, आ. उदय सामंत, आ. सदानंद चव्हाण यांनी सेनेचे गड राखण्यात मोलाची कामगिरी केली. तर उर्वरित दोन मतदारसंघांत राष्ट्रवादीने ‘किमया’ साधली. शिवसेनेला चांगले यश मिळाल्याने तीनपैकी एका आमदाराची मैत्री म्हणून वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. यापूर्वी राष्ट्रवादीत असताना पालकमंत्रीपद भूषवलेले आणि या वेळी शिवसेनेत डेरेदाखल झालेले आ. उदय सामंत यांच्याकडेही मंत्रिपद सोपवण्यात येईल अशी अटकळ होती. मात्र मूळचे कोकणचे असलेले मात्र कार्यक्षेत्र मुंबई असलेले रवींद्र वायकर यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली. येथूनच कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी सुरू झाली असल्याचे बोलले जाते. त्यातच पालकमंत्र्यांच्या कामगिरीवर जनता नाखूश असताना शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एवढेच नव्हे तर आमदार, खासदार नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालकमंत्री सेनेच्याच आमदार, खासदार पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे आणि जिल्ह्य़ातील पालकमंत्रिपदी कोकणातील एखाद्या आमदाराची नियुक्ती व्हावी ही सुप्त भावना मनात असल्यामुळेच पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याबाबतची नाराजी तीव्र स्वरूपात निर्माण झाली आहे.
दरम्यान, कोयनेच्या अवजलावरून शिवसेनेच्याच तीन मंत्र्यांमध्ये जुंपली असून शिवसेनेतील अंतर्गत वाद यामुळे चव्हाटय़ावर आला आहे. या सर्व प्रकारच्या दबावामुळे ना. रवींद्र वायकर हे राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची तथाकथित अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली. अर्थात ही वस्तुस्थिती आहे की अफवा याबाबत निश्चित काही सांगता येत नसले तरी एकूणच पालकमंत्र्यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा सूर यातून अप्रत्यक्ष उमटत आहे. तर दुसरीकडे पालकमंत्र्यांबाबतच्या नाराजीचे सूर थेट ‘मातोश्री’मध्ये जाऊन घुमले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पालकमंत्र्यांची खुर्ची डळमळती होणार की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.
एकीकडे कोयनेच्या अवजलाचा कित्येक वर्षांचा हा प्रश्न खितपत पडलेला आहे. त्यातच जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस पडूनही उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहिलेल्या या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मुंबईची तहान भागवण्याकरिता हे अवजल नेण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे कोकणचे सुपुत्र म्हणवणाऱ्या पालकमंत्री रवींद्र वायकर आणि त्यांच्या सुरात सूर मिसळणारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कोकणविरोधी भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या दोन नेत्यांच्या भूमिकेमुळेच शिवसेनेलादेखील अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बाबत ‘मातोश्री’ काय निर्णय घेते यावरच शिवसेनेचे यश अपयश अवलंबून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा