शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. शिवसेनेत दोन भाग पडले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा एक आणि उद्धव ठाकरेंचा एक असे दोन मेळावे पार पडले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.तसंच रवींद्र वायकर हे मेरिटवर निवडून आले आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
काय आहे रवींद्र वायकर यांच्या विजयाचं प्रकरण?
शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला आहे. मात्र, या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. याबाबत रवींद्र वायकर म्हणाले, “निकालाच्या दिवशी मी सकाळापासून टीव्ही बघत होतो. त्यादिवशी सायंकाळी ५ वाजून ५१ मिनिटांनी ‘दोन हजारांपेक्षा जास्त मतांनी अमोल किर्तीकर विजयी झाले’, अशी बातमी आली. याबाबत मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच सांयकाळी ६ च्या सुमारास मी मतमोजणी केंद्रावर पोहोचला. तेथील अधिकाऱ्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगतिलं की आम्ही अजून निकाल जाहीर केलेला नाही, मग ही बातमी कुठून आली? याचा अर्थ मतमोजणी केंद्रात इतर काही जणांजवळही मोबाईल होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच या मोबाईलमुळे खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? हे जर कुणी सिद्ध करून दाखवलं, तर बरं होईल”
हे पण वाचा- संजय राऊत यांची टीका, “शिवसेना फोडणं हे मोदी शाह यांचं मोगलानंतरचं सर्वात मोठं आक्रमण, कारण…”
रवींद्र वायकर भ्रष्ट माणूस असल्याची उद्धव ठाकरेंची टीका
शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात रवींद्र वायकर भ्रष्ट माणूस असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. “माझ्याकडे येऊन रडले, मला म्हणाले त्यांनी मला दोनच पर्याय ठेवलेत आमच्याकडे या किंवा तुरुंगात जा. या फोडाफोडीला काय म्हणायचं?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकरांना मिळालेला विजय हा मेरिटवर मिळाला आहे असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे काय रवींद्र वायकरांबाबत काय म्हणाले?
ईव्हीएमबाबत अनेक तज्ज्ञांनी मतं मांडली आहेत. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय आहे. तुमच्या मेहनतीचा विजय आहे, मेरिटवर मिळालेला विजय आहे. हा खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. रवींद्र वायकरांबाबत माझी काही वेगळी मतं होती, त्यांचीही काही वेगळी मतं होती. मात्र रवींद्र वायकर यांचा विजय हा खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. आमच्यात गैरसमज पसरवले ते उद्धव ठाकरेंनी. मला भेटल्यावर त्यांना कळलं माझं मन काय आहे. कारस्थानं कशी झाली, दुही कशी निर्माण केली हे सगळं त्यांना माहीत आहे. नियती कधीही कुणाला माफ करत नाही. उबाठा हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. उबाठा हा रडे गट आहे, कारण त्यांचा सारखा रडीचा डाव केला जातो आहे. जिंकलो जिंकलो ढोल पिटत आहात पण कुणाच्या जिवावर जिंकलात हे तुमच्या आत्म्यालाही माहीत आहे. शिवसेनेचा मतदार तुमच्या बरोबर राहिला का? याचा विचार करा. मुंबईत सव्वादोन लाख मतं आपल्याला मिळाली आहेत. उबाठाच्या मिरवणुकीत आणि प्रचारात पाकिस्तानचे हिरवे झेंडे फिरत होते. असाही आरोप एकनाथ शिंदेंनी केला.