रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ज्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करता येतं, त्याने क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असावं. पण, शरद पवारांना काहीच न येता, ते क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले होते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात केली आहे.
“शरद पवार पवार म्हणाले, मी गुगली टाकली. कारण, मी क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मुळात शरद पवार बेकायेशीरपणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले होते. ज्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करता येतं, त्याने क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असावं. पण, शरद पवारांना काहीच येत नाही, तरीही ते अध्यक्ष झाले,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
हेही वाचा : “…मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शरदवासी’ म्हणायचं का?” ‘त्या’ विधानावरून भाजपाचा पवारांवर हल्लाबोल
“शरद पवार कुस्ती संघटनेचेही काही काळ अध्यक्ष होते. पण, त्यांनी कधी कुस्त्या गाजवलेल्या किंवा हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचं, माझ्या ऐकण्यात नाही. मात्र, जिथे पैसा तिथे पवार घराणं. पैसा मिळाला की ते कशाचेही अध्यक्ष होतात,” असं टीकास्र सदाभाऊ खोत यांनी सोडलं आहे.
“शरद पवारांनी गुगली टाकली नव्हती. तर, महाभारतात शकुनीमामा डाव टाकून जसे पांडवांचं राज्य हिरावून घेतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या महाभारतातील शकुनीमामा म्हणजे शरद पवार आहेत. त्यांनी शकुनीमामा सारखेच सोंगाट्याचा डाव खेळला होता. आणि भाजपा शिवसेनेचं सरकार घालवलं होतं,” असा आरोप सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला आहे.