“सत्ता वाईट असते. मी भोगली आहे. माझी गाडी आली की, प्रत्येक तालुक्यात मागून दहा-बारा गाड्या लागायच्या. एक किलोमीटर पर्यंत रांग दिसायची. मला वाटायचं, माझं वजन खूपच वाढायला लागलंय. मंत्रीपद गेलं. तसं गाडी पण गेली आणि गाडीवाला पण गेला. मी एकटाच राहिलो. आधी मला रात्री एक-एक वाजेपर्यंत फोन यायचे आणि मी उचलायचो. आता मी त्यांना फोन केले तर कुणी उचलतही नाही. हे खूप वाईट”, अशी खंत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर मधील हातकंणगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते यांच्या प्रचार सभेत बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी आपल्या ग्रामीण शैलीत तुफान टोलेबाजी केली. सत्तेचे साईड इफेक्ट सांगत असताना त्यांनी स्वतःवरही विनोद केले.

“भाजपाला ४०० पार व्हायचं असेल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान…”, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा टोला

सदाभाऊ म्हणाले, २०१९ साली दुसरं (मविआ) सरकार आलं. मी मुंबईवरून माझी एक बॅग घेऊन गावाकडं आलो. गावात आल्यावर नेहमीप्रमाणे खुर्ची टाकून बसलो. एखाद्या गाडीची लाईट चमकली की, मला वाटायचं कुणीतरी माझ्याकडं आलंय. पण कुणीही साधी गाडीची काचही खाली करायचं नाही. हा अनुभव खूप वाईट होता. सत्ता असली की सगळे मागे पळत असतात.

“मंत्री झाल्यावर मी माझ्या मुलांसोबतही भांडण करायचो. मध्यरात्री जरी कुणी घरी आलं तरी त्यांना भेटायचो. मुलांनाही सांगायचो कुणालाही न भेटता पाठवू नका. लोकं घरी आलो की, त्यांना लसणाची चटणी, दही, ठेचा आणि भाकरी खाऊ घालोयचो. लोकही म्हणायचे, तुमच्यासारखा मंत्री कधी बघितला नाही. माझ्या बंगल्यावर मी हॉलमध्ये झोपायचो, पण माझ्या घरात कार्यकर्त्यांचा राबता असायचा. बंगल्यावरचे स्वयंपाकी थकून जायचे, पण प्रत्येक कार्यकर्त्याला खाल्ल्याशिवाय सोडायचो नाही. हे कार्यकर्ते पुढे कामाला येणार, असं म्हणायचो. पण सत्ता गेली अन् कुणीच काही कामाला आलं नाही. साधं चहा प्यायलाही कुणी बोलवंत नाही”, अशीही खंत सदाभाऊ यांनी व्यक्त केली.

“सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…

राजू शेट्टींबरोबर असतो तर दारिद्र रेषेखाली असतो

मी जुन्या शेतकरी नेत्याचे नाव आता घेणार नाही. पण त्यांनी मला कधीही मंत्री किंवा आमदार होऊ दिले नाही. २०१४ साली आम्ही एनडीएत असताना एकदा दिल्लीला जाण्याचा योग आला. तिथे अमित शाह यांच्याबरोबर बैठक होती. त्या बैठकीत मी माझ्या मंत्रिपदाबाबत बोललो. तेव्हा अमित शाह म्हणाले की, राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेतून कुणालाही मंत्री न करण्याचा निरोप दिला आहे. त्यावेळी मला धक्काच बसला. मग त्यानंतर कसा तरी त्या संघटनेतून निसटलो आणि मंत्री झालो. नाहीतर माझं नाव कायम दारिद्र रेषेखालीच राहिलं असतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rayat kranti sanghatana leader sadabhau khot describe side effect of power kvg