त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये उमटताना दिसत आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून येत आहेत. अमरावतीमध्ये तर जमावबंदचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान या हिंसक घटनांवरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक मोठं विधान केलं आहे.
“महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अनेक हिंसक घटना आणि दंगलींमागे रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे. प्रत्येक वेळी ते शांतता भंग करतात सर्व नियम पायदळी तुडवतात आणि बसून राहतं, बघत बसतं. सरकारने एकतर यांच्यावर बंदी आणावी, अन्यथा महाराष्ट्राच्या आम्ही भल्यासाठी त्यांना संपवू.” असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
तसेच, “महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत.” असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे.
याचबरोबर, “मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. कालच्या पेक्षा मोठे पण कोणालाही त्रास झाला नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात, औरंगजेबचे नाही.!” असं विधान देखील ट्विटद्वारे नितेश राणे यांनी केलं आहे.
दरम्यना अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकने कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून, जमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, नागरिकांना देखील आवाहन केले आहे.
अमरावतीमध्ये कडक निर्बंध, जमावबंदीचे आदेश ; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन
“परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्व जण घेऊया.” असं यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.