परभणी :  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची पुनश्च नव्याने स्थापना करण्यात आली आहे. दि. १० डिसेंबर २०२४ या दिवशी या प्रतिकृतीची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर नव्याने संविधान प्रतिकृतीची स्थापना आता करण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि.११) सायंकाळी राज्यसभेच्या खासदार श्रीमती फौजीया खान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, आशिष विजय वाकोडे, रवी सोनकांबळे आदींच्या उपस्थितीत संविधान प्रतिकृती पुनश्च स्थापित करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी प्रचंड खबरदारी घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी विविध वस्त्यांमध्ये जाऊन थेट संपर्क साधला व बैठका घेतल्या.

चार महिन्यापूर्वी परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर लगेचच या घटनेचे हिंसक पडसाद उमटले होते. दुसऱ्या दिवशी ११ डिसेंबरला आंबेडकरी संघटनांनी बंद पुकारला होता. मात्र या बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक तरुणांना अटक करण्यात आली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

न्यायालयीन कोठडीत असतानाच सोमनाथचा मृत्यू झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. सोमनाथच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोमनाथच्या कुटुंबीयांनी केली. सोमनाथच्या अंत्ययात्रेदरम्यान पॅंथर नेते विजय वाकोडे यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात अनेक दिवस तणावपूर्ण परिस्थिती होती. देशभरातील व राज्यातल्या अनेक नेत्यांनी यावेळी सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद अनेक दिवस उमटत राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर  पुन्हा त्याच ठिकाणी संविधान प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातील अधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अजिंठा नगर, राहुल नगर, गौतम नगर, भीम नगर या भागात बैठका घेऊन आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

फोटोओळी : चार महिन्यापूर्वी संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर परभणीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आता पुतळा परिसरात पुन्हा नव्याने संविधान प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली आहे.