कराड : कराडमध्ये मुक्कामास असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज गुरुवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. परंतु, या भेटीला काल साताऱ्यात झालेल्या दोन राजेंमधील संघर्षाची किनार होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्यही केले. अशा गोष्टी कधी-कधी होत असतात असे सांगत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.
सातारा बाजार समितीच्या जागेतील भूमिपूजनाच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या भाजपच्या उभय नेत्यांमध्ये तसेच त्यांच्या समर्थकात शाब्दिक द्वंद भडकले होते. या वादाकडे कमालीच्या गांभीर्याने पाहिले गेले. तर, सातारा पोलिसांनी खासदार उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर गुन्हाही दाखल केला. त्यामुळे उदयनराजेंविरुध्द शिवेंद्रराजे असा या दोन बंधूंमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला. दरम्यान, दोन राजेंमधील संघर्षाचा हा ताजा अध्याय चर्चेत असताना, त्यांच्या भाजप या पक्षाचे राज्याचे कारभारी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे दोन्ही राजे भेटले. काहीवेळ चर्चाही झाली. आणि लगेचच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांना गाठले असता. साताऱ्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर आणि सामाजिक विषयांसंदर्भात दोन्ही राजेंशी चर्चा झाली. सातारमधील ती गोष्ट फार गंभीर घडलेली आहे असे नव्हेतर अशा गोष्टी होतच असतात असे सहजपणे बोलत फडणवीसांनी उदयनराजे व शिवेंद्रराजेंमधील जोरदार वाद फार मोठा संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले. या दोघांसमवेत आपली विकासकामांवरच सविस्तर चर्चा झाली. दोन्ही राजांना जनसामान्यांचे प्रश्नच महत्वाचे असल्याने हे प्रश्न मांडताना, अशा गोष्टी कधी-कधी होत असतात. पण, फार काही गंभीर घडलेले नाही. फार अडचणीचेही नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यामधील वादात अधिक खोलात जाऊन बोलणे टाळत उलटपक्षी आपल्या पक्षाच्या या लोकप्रतिनिधींची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केली. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती असल्याचा विषय गंभीर नसल्याचे ते म्हणाले.
विठ्ठलाच्या दर्शनात राजकारण नको
भाजप विरोधकांची मोट बांधण्यात आघाडीवर असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव हे आपल्या मंत्रिमंडळासमवेत पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, पंढरपुरात या, विठ्ठलाचे दर्शन घ्या, भक्तिभावाने येणाऱ्यांचे इथे स्वागतच असेल. पण, अशा पद्धतीने राजकारणासाठी कोणी येऊ नये असा टोला फडणवीस यांनी लगावला.
नक्षलवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडू
गडचिरोलीमध्ये माओवादी किंवा नक्षलवाद्यांच्या मुलाची पोलीस भरतीला गेल्यावर हत्या होत असेलतर असे प्रकार सरकार हाणून पाडेल, त्यासाठी तेथील शासकीय यंत्रणा सक्षम आहे असा विश्वास देताना सरकारने माओवादी समूळ नष्ट करीत आणल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांचा प्रयत्न होत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.