सरकारी किंवा विविध संस्थांतर्फे साहित्य कृतींसाठी दिले जाणारे पुरस्कार, तसेच साहित्य-संस्कृतीशी संबंधित वेगवेगळ्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शीपणा टाळून भलतेच ‘विनोद’ राज्यात होत असताना, अमेरिकास्थित महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेने आपल्या विविध पुरस्कारांच्या मानकऱ्यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे ५०० जाणकार-वाचकांकडून शिफारशी मागविल्या आहेत.
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या या पुरस्कारांना आता मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. गेल्या २० वर्षांत मराठीतील उत्तमोत्तम वैचारिक ग्रंथांसह अनेक ललित साहित्यकृती वरील पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे संयोजन सुरुवातीच्या काळात केशव गोरे स्मारक ट्रस्टकडे होते. मागील ७ वर्षांपासून ही जबाबदारी ‘साधना ट्रस्ट’कडे आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये २०१५च्या ज्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ट्रस्टतर्फे सुरू झाली असून अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव, समन्वयक विनोद शिरसाठ यांच्या सहीने सुमारे ५०० सजग, जाणत्या वाचकांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यासोबत छापील अर्जही पाठविला असून साहित्य जीवनगौरव, वैचारिक, अपारंपरिक आणि ललित ग्रंथ पुरस्कारांसाठी कोणत्या लेखकाच्या लेखनकृतीला पुरस्कार द्यावा, याची शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे.
संबंधितांनी २० ऑगस्टपर्यंत शिफारस अर्ज भरून साधना ट्रस्टकडे पाठवावा, अशी संयोजकांची अपेक्षा असून या ५०० मान्यवरांना टपाल खर्चाचाही भुर्दंड लागू नये, याची दक्षताही घेण्यात आली आहे. वरील पुरस्कारांच्या मानकऱ्यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्रात निवड समिती असून या समितीने पार पाडलेल्या जबाबदारीवर अमेरिकेतील समितीकडून शिक्कामोर्तब केले जाते. १९९४ मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कार योजनेत आजवर सुमारे १०० साहित्यकृतींचा गौरव झाला. प्रसिद्ध विचारवंत (कै.) ना. य. डोळे यांच्या ‘काश्मीर प्रश्न’ या ग्रंथाला १९९९ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यानंतर ९ वर्षांनी त्यांचे पुत्र जयदेव डोळे यांच्या ‘समाचार’ पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड झाली.
एका घरातील दोन लेखकांचा गौरव हे गेल्या २० वर्षांतील एकमेव उदाहरण. मराठवाडय़ातील नरेंद्र चपळगावकर, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. चंद्रकांत पाटील, ना. धों. महानोर, अनुराधा पाटील, श्रीकांत देशमुख, स. रा. गाडगीळ, भारत सासणे, बाबा भांड, आसाराम लोमटे, राम दोतोंडे, अतुल देऊळगावकर यांच्या पुस्तकांचाही वरील पुरस्काराने सन्मान झाला.
या पुरस्कार योजनेत सजग वाचकांना सहभागी करून, तसेच त्यांच्या शिफारशींचा विचार करून सर्वोत्तम साहित्य कृतीचा सन्मान व्हावा, असा प्रयत्न संयोजक साधना ट्रस्टने केला आहे. सरकारी किंवा खासगी संस्था ‘रमणा’ वाटल्यागत पुरस्कारांचे मानकरी निष्टिद्धr(२२४)चत करीत असताना साधना ट्रस्टचा पारदर्शीपणा स्वागतार्ह व अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया मसापच्या नांदेड शाखेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषदेने आपले पुरस्कार याच धर्तीवर द्यावेत, असेही त्यांनी सुनावले.

Story img Loader