अभ्यास व संशोधन करण्यास वाचनाची गरज आहे, पण आज नवीन पिढी वाचनापेक्षा ब्रेकिंग न्यूजला प्राधान्य देत असल्याने इंटरनेट जगात वाचनाची सवय कमी होत चालली असली तरी वाचनानेच संस्कारमय आनंद मिळतो, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
श्रीराम वाचन मंदिराने देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेचे आयोजन केले त्या वेळी उद्घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. या वेळी वाढती गुन्हेगारी आणि आपण यावर विवेक काशीकर यांनी विचार मांडले. प्रसंगी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, डॉ. जी. ए. बुवा, रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात आमदार म्हणून वावरायला मला रस नाही, त्यामुळे मी खासदार म्हणूनच राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा आमदार असल्याने मला दिल्लीतच काम करायला आवडेल. दीपक केसरकर यांना आमदारकीची ताकद काय असते हे माहीत आहे, असे सांगत महाराष्ट्रात परतण्याचा विचार नसल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. इंटरनेटमुळे प्रचंड माहिती मिळत आहे. आता डिक्शनरीची जागा गुगलने घेतली आहे. त्यामुळे वाचनालयातील आवड सावंतवाडीने ठेवून सुसंस्कृतपणा दाखविला आहे. वाचन संस्कृती टिकणे आवश्यक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ब्रेकिंग न्यूजमुळे नवीन पिढी वाचनापासून दूर झाली आहे, असे त्या म्हणाल्या. अभ्यास व संशोधनासाठी वाचनाची गरज आहे. आम्ही संसदेच्या वाचनालयात जाऊन जुन्या भाषणाचा अभ्यास करतो असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पण संसदेतील भाषणाची चर्चा दाखविण्यापेक्षा गोंधळाला प्राधान्य दिले जाते. सुरेश प्रभूसारख्या अभ्यासू खासदारांची भाषणे दिशादर्शक ठरतात असे त्यांनी सांगून यशवंतरावांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आज समाज परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढती गुन्हेगारी नष्ट होईल. कोकण प्रदेश सुसंस्कृत असून महाराष्ट्र गुन्हेगारीत गुरफटला नाही, असे त्या म्हणाल्या.
या वेळी विवेक काशीकर यांनी नागरिकांनी कर्तव्य व चिंतन केल्यास गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार नाही. त्यासाठी सर्वानी जबाबदारीचे भान ठेवावे असे आवाहन केले. डॉ. जी. ए. बुवा यांनी प्रास्ताविक तर प्रा. अरुण पणदूरकर यांनी सूत्रसंचालन केले.