नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर तैनात करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर युनिटचा वापर नक्षलविरोधी मोहिमेसाठी केला जाणार असला तरी त्यांची फक्त मदत घेतली जाईल, प्रत्यक्षात हेलिकॉप्टर्समधून नक्षलवाद्यांवर हल्ले केले जाणार नाहीत, असे वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल एन.ए.के. ब्राऊनी यांच्या विधानानंतर स्पष्ट झाले आहे.  छत्तीसगडमधील बस्तर प्रदेशात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्यात सलवा जुडूमचे प्रणेते महेंद्र कर्मा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्यासह २७ जण मारले गेल्यानंतर केंद्र आणि छत्तीसगड सरकारने बस्तरमधील नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी युद्धपातळीवर मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला साह्य़ करण्यासाठी नागपुरात हेलिकॉप्टर युनिट तैनात करण्यात येणार आहे.
माओवाद्यांचा भक्कम गड समजल्या जाणाऱ्या जगदलपूर जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांचा पुरेपूर सफाया करण्यासाठी तीन हजारांवर जवानांची फौजच उतरली आहे. नागपूर हे छत्तीसगडपासून अत्यंत जवळ असल्याने हेलिकॉप्टर युनिट उभारण्यासाठी सोयीचे आहे. त्यामुळे सदर हेलिकॉप्टर तळावरून एखाही मोठी आक्रमक मोहीम राबविली जाईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. परंतु, नक्षलविरोधी मोहीम राबविताना हेलिकॉप्टर्स फक्त जमिनीवरील दलांच्या आपत्कालीन मदतीसाठी वापरले जातील, हेलिकॉप्टर्सचा प्रत्यक्ष मोहिमेत कोणताही सहभाग राहणार नाही, तसेच नक्षलवाद्यांच्या तळावर हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत, असे वायुदलाच्या बडय़ा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने हा तळ फक्त आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीपुरता वापरला जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
छत्तीसगडमधील बस्तर प्रदेश अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलांचा भाग असल्याने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबविणे अत्यंत कठीण झाले आहे. नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या गटांना जंगलांची खडा न् खडा माहिती असल्याने पोलीस आणि निमलष्करी दलांना चकमा देण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. शिवाय जगदलपूरपासून दंतेवाडापर्यंतच्या अनेक भागात नक्षलवाद्यांनी सुरूंग पेरलेले आहेत. त्यामुळे या भागात वावरताना पोलीस पथकांना अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागतात.
कोणत्याही परिस्थितीत नक्षलवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई केली जाणार नसल्याचे संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी सांगितल्यानंतर नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर वायुदलाची हेलिकॉप्टर्स तैनात करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे येथून एखादी मोठी कारवाई केली जाण्याच्या शक्यतेला उत आला होता. आता वायुदल प्रमुखांनीच एकंदर स्थिती स्पष्ट केली आहे.
माओवाद्यांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये आता पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी यंत्रणा राबविण्याची गरज असल्याने टेहळणी क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जाऊ शकते. सद्यस्थितीत वायुदलाची सहा एमआय १७ हेलिकॉप्टर्स गोरखपूर युनिटवर तैनात असून तेथून झारखंडमधील रांची, छत्तीसगडमधील रायपूर आणि जगदलपूर भागात ऑपरेशन राबवीत आहेत. नागपूरमधून तात्काळ मदतीसाठी जगदलपूरला हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नागपुरात एमआय १७चे युनिट लवकरच सक्रिय होणार आहे.

Story img Loader