पं. रविशंकरजी आणि पं. भीमसेन जोशी या दोघांचा ऋणानुबंध १९४० च्या दशकापासूनचा होता. सतारवादनाच्या मैफलीपूर्वी रविशंकरजी मेकअप करायचे. हे ध्यानात घेऊन बाबांनी ‘मॅक्स फॅक्टर’ असे त्यांचे नामकरण केले होते. ‘मेरे बाद कौन कलाकार है’ असे विचारल्यानंतर रविशंकरजी यांना ‘भीमसेन जोशी’ असे उत्तर संयोजकांकडून मिळायचे. ‘ये तो भूत है’ ही रविशंकरजी यांची भावना होती. त्यामुळेच ते बाबांना प्रेमाने ‘भूत’ असे संबोधत असत. दोघांनी एकमेकांना अशी टोपणनावे ठेवली होती.. या दोन दिग्गज कलाकारांमधील प्रेम आणि आदरभावना याला स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी उजाळा दिला. ‘पंडितजींच्या निधनामुळे खरा दिग्गज कलाकार आपल्यातून गेला’, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये ज्येष्ठ सतारवादक पं. रविशंकरजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्यावरील लघुपट यावेळी दाखविण्यात आला. त्यानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आपल्या मनोगतातून या दोन दिग्गज कलाकारांमधील ऋणानुबंध उलगडला.
श्रीनिवास जोशी म्हणाले, या दोघांची भेट नेमकी केव्हा झाली हे सांगता येणार नाही. १९४० च्या दशकामध्ये ही भेट झाली असे निश्चितपणे सांगता येईल. बाबा, पं. रविशंकरजी, उस्ताद अली अकबर खाँ, उस्ताद अल्लारखाँ हे प्रतिभावंत आणि गुणी कलाकार एकदा कलकत्ता येथे गेल्यानंतर त्यांचा महिनाभर मुक्काम असायचा. त्यामुळे एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबरच त्यांच्यामधील दोस्ती घट्ट झाली. त्यांच्यामध्ये सांगीतिक आदानप्रदान होत असे. पूर्वी आम्ही गोपाळ गायन समाज रस्ता येथे राहात असताना पं. रविशंकरजी आमच्याकडे आले होते. पं. रविशंकरजी, बाबा, पु. ल. देशपांडे यांचे एकत्रित छायाचित्र आमच्या संग्रहामध्ये आहे. पं. रविशंकरजी यांची प्रत्यक्ष मैफल मी ८० च्या दशकामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्येच ऐकली आहे. पंडितजी आणि त्यांचे चिरंजीव शुभ शंकर यांचे एकत्रित वादन झाले होते. आता शुभ शंकर आपल्यामध्ये नाहीत. पण, ही मैफल अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्यावेळी पंडितजींना भेटता आले आणि त्यांचे दर्शन घेता आले.
‘आयटीसी’च्या संगीत रीसर्च अॅकॅडमीने दहा वर्षांपूर्वी पं. रविशंकरजी आणि पं. भीमसेन जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर या दोघांचेही कार्यक्रम सादर झाले. बाबांच्या गायनाच्या वेळेस तंबोऱ्यावर मी होतो. त्यामुळे याप्रसंगी रविशंकरजी यांची मैफल मी अनुभवली होती. हीच या दोघांची शेवटची भेट ठरली. पाच वर्षांपूर्वी पं. रविशंकरजी यांची मैफल पुण्यामध्ये झाली होती. त्यावेळी ते बाबांना भेटण्यासाठी घरी येणार होते. पण, काही कारणांमुळे त्यांना येणे शक्य झाले नाही. पण, या दोघांचे दूरध्वनीद्वारे संभाषण झाले होते, अशा आठवणी श्रीनिवास जोशी यांनी जागविल्या.
बाबांच्या निधनानंतर त्यांचे श्रद्धांजली व्यक्त करणारे पत्र आले होते. ‘माझ्याबरोबरचे सगळे दिग्गज गेले. त्यामध्ये आता भीमसेनजीदेखील सहभागी झाले. त्यांना भेटण्यास मी लवकरच येत आहे’, हा या पत्रातील मजकूर वाचून मलाही गहिवरून आले होते. जून महिन्यामध्ये मी अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी पं. रविशंकरजी यांना भेटण्याचे ठरविले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याने मला त्यांना भेटता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त
केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा