Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा आहे. १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.

Live Updates

Eknath Shinde Plea Hearing Updates : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे सर्व अपडेट्स एका क्लीकवर Read in English 

13:47 (IST) 27 Jun 2022
…म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागत आहोत – शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद

राज्यात आमदारांच्या कार्यालयावर, घरावर हल्ले होत असून मृतदेह परततील अशी वक्तव्यं केली जात आहे. राज्यात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आम्ही हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात आलो असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने यावेळी याची खातरजमा करण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा नसल्याचं म्हटलं.

13:39 (IST) 27 Jun 2022
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला हायकोर्टात का गेला नाहीत? अशी विचारणा केली आहे. यावर या प्रकरणाची तत्परता पाहता आपण सुप्रीम कोर्टात आल्याचा युक्तिवाद शिदेंच्या वकिलांकडून करण्यात आला.

काही नेत्यांकडून मृतदेह परततील अशी वक्तव्यं करण्यात आली असल्याचं यावेळी शिंदेंच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं.

13:36 (IST) 27 Jun 2022
ईडीने समन्स बजावल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या आणि मला अटक करा अशा शब्दांत आव्हान दिलं आहे. मला रोखण्यासाठी हे कारस्थान रचलं जात असून, माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही असंही ते म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे. ईडीने संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणी समन्स बजावलं असून उद्या हजर राहण्यास सांगितलं आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1541332202516258816

13:35 (IST) 27 Jun 2022
विधानसभेचे अधिवेशन बोलवा – नाना पटोले

कोणाकडे बहुमत आहे हे सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवा अशी मागणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

13:09 (IST) 27 Jun 2022
सत्तासंघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:

शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

13:06 (IST) 27 Jun 2022
बंडखोर मंत्री, राज्यमंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय

मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या काही आमदारांनाही बंड पुकारलं असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. जनतेची, जनहिताची कामं अडकू नयेत यासाठी उद्धव ठाकरेंनी या मंत्र्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी या सर्व खात्यांचं फेरवाटप केलं आहे.

(IST)
३८ आमदारांनी पाठिंबा काढला, शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टातील याचिकेत घेतला आहे. ३८ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी

12:30 (IST) 27 Jun 2022
कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक; पोलिसांसोबत झटापट

कोल्हापुरात बंडखोर शिवसेना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला असताना त्यांच्या विरोधातही आंदोलन होत आहे. यादरम्यान पोलिसांनी अडवलं असता शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.

तुम्हाला सोडणार नाही, सळो की पळो करुन सोडणार असा इशारा शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांना दिला आहे.

12:19 (IST) 27 Jun 2022
जळगावमध्ये युवा सेनेतर्फे रक्ताने पत्र लिहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा

जामनेर तालुका युवासेना व शिवसेना यांची बैठक पार पडली. यावेळी युवासेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील यांच्या रक्ताने पत्र लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला. जामनेर तालुक्यातील ५१ युवासेना पदाधिकाऱ्यांनी रक्ताने अंगठ्याचे ठसे या पत्रावर लावले आहेत.

12:03 (IST) 27 Jun 2022
महाविकास आघाडी अल्पमतात, शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टातील याचिकेत घेतला आहे. ३८ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

11:44 (IST) 27 Jun 2022
अखेरच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेसोबत – सुनील राऊत

मी गुवाहाटीला का जाईन? त्यापेक्षा मी निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी गोव्यात जाईन. त्या बंडखोरांचे चेहरे पाहण्यासाठी मी गुवाहाटीला जाईन का? मी शिवसैनिक आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी काम करत राहीन असं शिवसेनेचे सुनील राऊत म्हणाले आहेत.

नारायण राणे आणि राज ठाकरे त्यांना हवं ते म्हणू शकतात. उद्धव ठाकरेंचा नक्कीच विजय होईल. मी शिवसेनेसोबत होतो आणि राहीन असंही ते म्हणाले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1541281449600753664

11:38 (IST) 27 Jun 2022
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते उस्मानाबादमध्ये रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे भूम शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून पुण्यातील कार्यालय फोडलं होतं.

11:34 (IST) 27 Jun 2022
कोल्हापुरात बंडखोर राजेंद्र यड्रावकर यांच्या समर्थनार्थ मोर्चा

शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकर शिंदे गटात सामील झाले आहेत. एकीकडे बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु असताना कोल्हापुरात यड्रावकर यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. राजेंद्र यड्रावकर यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

11:24 (IST) 27 Jun 2022
“बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना काहीच यातना होत नाहीत का?”

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. एकनाथ शिंदे यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1541296111578558464

10:56 (IST) 27 Jun 2022
माजी नगरसेवक प्रकाश शिंदे हे सभेला संबोधित करण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रकाश शिंदे हे संबोधित करण्याची शक्यता आहे.

10:41 (IST) 27 Jun 2022
एकनाथ शिंदे गट निकालानंतर राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवरील निर्णयानंतर बंडखोरांचा गट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करु शकतो. तसेच शिंदे गटाची आज दुपारी बैठकही होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

09:50 (IST) 27 Jun 2022
न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी

एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

09:37 (IST) 27 Jun 2022
“उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या भूमिकेत…”; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन याचिकांवर न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना शिवसेना बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर…

09:24 (IST) 27 Jun 2022
आमदारांना बजावलेली नोटीस आणि गटनेते नियुक्तीवर आक्षेप

शिंदे गटाच्या वतीने या आमदारांना बजावण्यात आलेली नोटीस आणि नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आह़े. याच याचिकेवर काही क्षणात सुनावणी होणार आह़े

09:21 (IST) 27 Jun 2022
दोन्ही बाजूने निष्णात वकील

बंडखोर एकनाथ शिंदे आणि शिवसेना अशा दोन्ही बाजूंनी निष्णात वकील नेमण्यात आहेत. शिंदे यांची बाजू अॅड हरीश साळवे तर शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील कपील सिब्बल मांडणार आहेत.

09:20 (IST) 27 Jun 2022
सकाळी साडे दहा वाजता सुनावणीस सुरुवात होणार

एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता या सुनावणीस सुरवात होईल.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (संग्रहित फोटो)