शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात जाऊन शिवसैनिक आणि जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ते बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत आहे. बंडखोर आमदारांचा उल्लेख ते सातत्याने ‘गद्दार’ असा करत आहेत. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जे काही केलं ते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात करत आहेत, अशी टीका केसरकरांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले की, “जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने जेव्हा संपूर्ण जगाला महायुद्धाच्या दरीत ढकललं होतं, तेव्हा त्यांच्यासोबत गोबेल्स होते. हिटलरच्या सत्तेत गोबेल्स हे मंत्रीही होते. गोबेल्सची एक नीती होती, शंभर वेळा एक खोटं बोला, लोकांना ते खरं वाटायला लागतं. आज तेच काम महाराष्ट्रात आदित्य ठाकरे करत आहेत.”

हेही वाचा- “गोविंदाना आरक्षण देण्यापेक्षा डोंबारी खेळ करणाऱ्या…” तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन लोकांमध्ये खोटी माहिती पसरवण्याचं काम करत आहेत. मी यापूर्वीही सांगितलं होतं की, आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्यामुळे मी त्यांचा आदर करतो. पण ते गोबेल्सच्या रस्त्यावर गेले तर ते आम्ही सहन करणार नाही. ही भूमी गोबेल्सच्या नीतींना मान्यता देणारी भूमी नाही, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे” असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा- “…म्हणून गोविंदांना ५ टक्के आरक्षण” मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रोहित पवारांकडून शंका उपस्थित

दरम्यान, त्यांनी मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केलं आहे. भाजपा आणि शिवसेना मिळून येत्या निवडणुकीत १५० हून अधिक जागा मिळवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाबरोबर आमची आता कायमची युती असून आमच्या स्वार्थासाठी ती तोडणार नाही, असंही ते म्हणाले.

Story img Loader