गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. मातोश्री किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात आम्ही काहीच बोलणार नाही, असा पवित्रा बंडखोर आमदारांनी सुरुवातीला घेतला होता. मात्र, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने बंडखोर आमदारांनीदेखील प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले, “नेत्यानं कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. आम्ही नेहमी गावपातळीवर काम करतो. गावचा सरपंचदेखील त्यांच्या सदस्यांचं ऐकत असतो. जिल्हा परिषद सदस्यांचं झेडपी अध्यक्ष ऐकत असतो. नगरसेवकांचं नगराध्यक्ष ऐकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमदारांचं ऐकलं पाहिजे ना? ज्यावेळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, तेव्हा त्यांच्याशी सहज बोलता येत होतं. हा मंत्री ऐकत नाही, तो मुख्यमंत्री ऐकत नाही, असं म्हणता येत होतं.”
“पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही कुणाकडे बोलायचं? हा माझा व्यक्तीगत अडचणीचा विषय नव्हता. पण पहिल्यावेळी निवडून आलेल्या आमदारांची फार खदखद होती. त्यामुळे आम्ही वारंवार हे प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी मातोश्रीतून गुवाहाटीला जाणारा शेवटचा होतो, ३४ वा होतो. आम्ही हेच सांगायला गेलो होतो की, अजूनही वेळ गेली नाही, त्यांना परत बोलवा” अशी नाराजी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे.
“त्यावेळी संजय राऊतांनी आम्हाला सांगितलं की, तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीपण जा. अशा पद्धतीचं राजकारण आम्हाला कुठेच दिसत नाही. ४ लाख लोकांतून निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही हलकटासारखे सांगता निघून जा. त्यामुळे आम्हीही विचार केला की मंत्रीपद गेलं खड्ड्यात. आम्ही मंत्रीपद सोडून बाहेर निघालो. इतर लोक साधं सरपंचपदही सोडत नाहीत. यावरून तुमच्या लक्षात येईल की केवढी तीव्रता असेल” अशी खदखदही पाटलांनी बोलून दाखवली.