शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आता बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांमुळे गुंता वाढला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांमुळे शिवसेनेत फूट पडली का? असं विचारलं असता सदा सरवणकर म्हणाले की, “एखाद-दुसऱ्या व्यक्तीसाठी मी आजूबाजूच्या सर्वच लोकांना बदनाम करणं योग्य ठरणार नाही. संजय राऊतांनी आपली भूमिका दररोज वेगवेगळ्या भाषेत प्रकट करणं योग्य नाही. महाराष्ट्राची संस्कृती नसलेल्या भाषेत ते बोलले. त्यामुळे लोकांची मनं दुखावली गेली. लोकांचे स्वाभिमान जागे झाले. राऊत यांनी कुणाची आई काढली, कुणाला डुक्कर बोलेले, कुणाचा बळी द्या म्हणाले. ही आपली संस्कृती नाही. संजय राऊत यांनी बरेच गुंते करून ठेवले आहेत.”

“या सर्वांचा त्रास आज उद्धव ठाकरेंना देखील होत आहे. कुणीतरी सांगतंय म्हणून त्यांचं ऐकतील असं उद्धव ठाकरे यांचं व्यक्तीमत्व नाहीये, ते स्वत: चे निर्णय घ्यायला सक्षम आहेत,” असंही सरवणकर म्हणाले.

हेही वाचा- “मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर खोचक टीका

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेबाबत बोलताना सरवणकर म्हणाले, “आम्ही सुद्धा शिवसेना प्रमुखांनाच मानतो. त्यांच्याजवळच आमच्या निष्ठा आहेत. आम्ही गद्दार नाहीत. शिवसेनेशी आमच्या जशा निष्ठा आहेत, तशाच निष्ठा आमच्या मतदारांशी देखील आहेत. मतदार तडफडत असताना आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तसं पाहू शकलो तर पहिली गद्दारी आम्ही मतदारांशी केली असती. पण आम्ही तसं केलेलं नाही. शिवसेनेशी तर नाहीच नाही. आजही आमच्या घरी शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे. आमच्या दारात भगवा आहे. आमच्या हातात शिवबंधन आहे. आदित्य ठाकरेंबाबत बोलायचं झालं, तर ते एक तरुण व्यक्तीमत्व आहेत. संघटना वाढवण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel mla sada sarvankar on shivsena mp sanjay raut rmm