शिंदे गटाचे समर्थक संजय गायकवाड यांनी एक आठवड्यापूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विरोधकांना इशारा देताना त्यांनी ‘चुन चुन के मारेंगे’ असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. “आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?” असं अजित पवार म्हणाले होते.
या विधानावरून बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले की, पहिली गोष्ट अशी आहे की, आमचं विधान बुलढाणा जिल्ह्यातील जे वाचाळवीर आहेत, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा ५० बंडखोर आमदारांवर टीका करत होते, त्यांच्याबद्दल होतं. आता अजित पवार हे त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले किंवा ते त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले? हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होतो.
“मला हिंदी बोलता येत नाही म्हणत अजित पवारांनी माझी नक्कल केली. पण मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेला मराठी माणूस आहे, शेतकरी आहे, रांगडा गडी आहे, नांगरावरचा गडी आहे. असं असूनही मी विधानसभेत पोहोचलो आहे. मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून आलो नाही. जशी मराठी येते, त्याप्रमाणे रागारागात मी ते विधान केलं” असंही गायकवाड यावेळी म्हणाले.
अजित पवारांना उद्देशून संजय गायकवाड पुढे म्हणाले की, आम्ही तुमच्यासारखे सोन्याचे चमचे घेऊन पैदा झालो नाही. आमच्या बापानं कष्ट करून आम्हाला थोडंफार शिकवलं आणि आम्ही विधानसभेत पोहोचलो. तुमच्यासारखं पैशावाल्यांच्या घरात आम्ही जन्म घेतला नाही, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला आहे.