महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर बराच काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अलीकडेच या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मलाईदार खाती भारतीय जनता पार्टीला गेल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदच मिळालं नाही, यामुळे तेही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात सर्व इच्छुक आमदारांना मंत्रीपदं मिळणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
शिंदे गटातील आमदारांची नाराजी आणि शिंदे गटाला मिळालेल्या अतिरिक्त खात्यांबाबत विचारलं असता, संजय गायकवाड म्हणाले की, “याला अतिरिक्त खाते म्हणता येणार नाही. हे सर्व नेहमीचे खाते असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करून याचं वाटप केलं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणारचं नाही किंवा बाकीच्या आमदारांना मंत्रीपद मिळणारच नाही, असं जे कोणी लोकं बोलत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की, प्रत्येक कॅबिनेट खात्याला राज्यमंत्री द्यावाच लागतो, ही कायदेशीर तरतूद आहे.”
हेही वाचा- राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट, सिंचन घोटाळ्याचाही केला उल्लेख
“त्यामुळे सप्टेंबर महिन्यात राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही सांगितलं आहे. तसेच उर्वरित जे कोणी आमदार आहेत, ज्यांना मंत्रिपदाची इच्छा आहे, त्या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे” असंही गायकवाड यावेळी म्हणाले.