राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत खैरेंची त्यांच्या वयानुसार बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे. खरं तर, चंद्रकांत खैरेंनी औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय गायकवाड यांच्यावर बोचरी टीका केली होती.
हेही वाचा- “…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा
“संजय गायकवाड किती फालतू, थर्डक्लास आणि चारित्र्यहीन माणूस आहे, हे बुलढाण्याच्या लोकांना माहीत आहे. शिंदे गटात गेलेले चाळीस चोर सगळेच्या सगळे आगामी निवडणुकीत पडणार आहे” अशी टीका चंद्रकांत खैरेंनी केली होती.
हेही वाचा- “उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” डावा हातही तुरुंगात जाणार म्हणत किरीट सोमय्यांचा थेट इशारा
चंद्रकांत खैरेंच्या टीकेला संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी चंद्रकांत खैरेंचा एकेरी उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे. ते यावेळी म्हणाले की, “चंद्रकांत खैरेची त्याच्या वयानुसार बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तो कुणाला चारित्र्यावरून बोलतोय, हे त्याला माहीत असायला पाहिजे. आतापर्यंत माझं रेकॉर्ड आहे, मी लव्ह जिहादमध्ये गुंतलेल्या २२२ मुली परत आणल्या आहेत. जी महिला आपल्या नवऱ्याकडे गऱ्हाणं सागू शकत नाही, त्या मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला त्यांची गाऱ्हाणी सांगतात. याठिकाणच्या महिलांनी मला निवडणुकीत रक्ताचे शिक्के मारून प्रेम व्यक्त केलं होतं. हे चंद्रकांत खैरेला माहीत नसेल. आपण कुणाबद्दल काय बोलतोय, याची माहिती खैरेंनी घ्यायला हवी. इथे शिवरायांचे पाईक बसलेत, दलाल नाहीत,” असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं आहे.