शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याने विरोधकांसह भाजपातील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या सर्व घटनाक्रमांनंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पुणे पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली असून आपल्याला क्लिन चीट मिळाली आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली आहे.
“मागील पंधरा महिन्यांपासून मी आणि माझं कुटुंब मानसिक तणावात होतं. त्यातून कुणीही जाऊ नये. गेली ३० वर्षे राजकीय-सामाजिक जीवनात मी वावरत आहे. चार वेळा प्रचंड मताधिक्यानं निवडूनही आलो आहे. अशा स्थितीत माझं राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रकार झाला. त्या सर्व परिस्थितीला मी सामोरं गेलो. माझ्यावर आरोप झाल्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी, म्हणून मी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण माझ्यावर झालेल्या आरोपात काहीही तथ्य आढळलं नाही, याबाबतच पत्रक पुणे पोलिसांनी जारी केलं आहे” असंही राठोड यावेळी म्हणाले.
हेही वाचा- “आमदार-खासदार विकत घेतले पण…” विनायक राऊतांची भाजपावर टीका
पुढे त्यांनी सांगितलं की, “न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर माझा विश्वास होता, म्हणून मी आतापर्यंत शांत होतो. पण तपासानंतर आता सर्व सत्य बाहेर आलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, मलासुद्धा परिवार आहे, मुलंबाळं आहेत, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहेत. अशा गोष्टीचा किती त्रास होतो, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. आतापर्यंत मी शांत होतो, पण येथून पुढे असंच वातावरण राहिलं तर मी कायदेशीर मार्गही अवलंबणार आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवणार आहे.”
हेही वाचा- मोठी बातमी! ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर
“पूजा चव्हाण प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी पुणे न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण न्यायालयाने दोन्हीही याचिका फेटाळून लावल्या आहेत. आतापर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ आरोप झाले, म्हणून माझ्यामागे चौकशी लावण्यात आली होती. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी म्हणून मी मंत्रीपदावरून बाजूला झालो होतो” अशी माहितीही संजय राठोड यांनी यावेळी दिली आहे.