शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रविवारी बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाऊन निर्धार मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात केलेल्या भाषणात विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ आहे. तर शहाजीबापू पाटील हे त्यातील ‘सोंगाड्या’ आहेत, अशी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनायक राऊतांच्या या टीकेला आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख ‘नाच्याचा खेळ’ असा केला आहे, तर विनायक राऊत त्यात नाचत होते का? असा बोचरा सवाल शहाजीबापूंनी विचारला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- “४० चोर गेले म्हणजे शिवसेनेचा संपत नाही”; विनायक राऊतांची शिंदे गटावर टीका

संबंधित व्हिडीओत शहाजीबापू पाटील म्हणाले की, “आज सांगोला येथे खासदार विनायक राऊत यांनी उरल्या-सुरल्या तुटपुंज्या शिवसेनेची सभा घेतली. सांगोला तालुक्यात जिथे शिवसेनेची लाखोंच्या संख्येत मेळावे भरवण्याची ताकद होती, तिथे विनायक राऊतांवर ५०-६० टुकार पोरांच्यात मेळावा घेण्याची वेळ आली आहे. विनायक राऊतांनी आपल्या भाषणात या सरकारचा उल्लेख ‘काळू-बाळूचा तमाशा’ असा केला आहे, तर शहाजीबापू त्यात ‘सोंगाड्या’ आहे, अशी व्याख्या केली आहे.”

हेही वाचा- “शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण…”, विनायक राऊतांचा जोरदार हल्लाबोल

विनायक राऊतांवर टीकास्र सोडताना शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांचा ‘नाच्याचा खेळ’ होता आणि विनायक राऊत त्यात नाचत होते का? असं एखादं विधान मी केलं तर त्यांना वाईट वाटायला नको. विनायक राऊतांच्या प्रत्येक मुद्द्याला त्यांच्या मतदारसंघात जाऊन सात तालुक्यात सात सभा घेऊन मी सडेतोड उत्तर देणार आहे. आज ते येथे बोलले म्हणून मी येथेच बोलणं योग्य नाही. कोकणातदेखील माझी भाषणं ऐकण्यासाठी विनायक राऊतांनी त्यांच्या कानातला मळ काढून ठेवावा” अशी टीकाही शहाजीबापू पाटलांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel mla shahajibapu patil on shivsena mp vinayak raut sangola speech nirdhar melava nachyacha khel rmm