रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मावळते खासदार नीलेश राणे यांचा दणदणीत पराभव केल्यामुळे प्रकाशझोतात आले आहेत. पण राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या खासदार पुत्राविरुद्ध जनमत संघटित करण्यात आमदार केसरकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.
निवडणूक काळात रत्नागिरी शहरातील प्रचारसभेत बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता, तर निवडणूक निकालानंतर रविवारी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित खासदार राऊत यांनी केसरकरांसाठी जणू पायघडय़ाच घातल्या. ‘आमदार केसरकरांसारखी व्यक्ती विधानसभेत महायुतीतर्फे निवडून आल्यास मंत्री बनू शकते’, असेही राऊत यांनी सूचकपणे नमूद केले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मात्र या निवडणुकीत राणेंविरोधी भूमिका घेतलेल्या केसरकरांसह पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सतत फटकारण्याचे धोरण ठेवले आहे. गेल्या १४ मे रोजी सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्येही त्याचा कार्यकर्त्यांना अनुभव आला. त्यामुळे आमदार केसरकर व हकालपट्टी झालेले जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांचे समर्थक कार्यकर्ते अत्यंत दुखावले आहेत.
या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीत राहून अपमान सहन करण्यापेक्षा सन्मानाने निमंत्रण देत असलेल्या महायुतीच्या पर्यायाचा विचार करावा, असा दबाव कार्यकर्त्यांकडून या नेत्यांवर वाढत आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात आणि राज्यात निर्माण झालेले राजकीय वातावरण लक्षात घेता काँग्रेस आघाडीबरोबर राहण्यात फारसे राजकीय भवितव्य नसल्याचाही या कार्यकर्त्यांचा युक्तिवाद आहे. खुद्द आमदार केसरकरांशी या संदर्भात संपर्क साधला असता, राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, मात्र तरीही राष्ट्रवादीमध्येच राहायचे की अन्य पर्यायांचा स्वीकार करायचा, याबाबत मी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही.
आपण घेऊ त्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही सर्व सहकारी व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून भावी दिशा ठरवण्यात येईल.

Story img Loader