शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. महाविकास आघाडीमधील ५० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजधानी दिल्लीत १२ खासदारांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी १२ खासदारांसह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी देखील आपली मतं मांडली असून संबंधित १२ खासदार शिंदे गटात सामील का झाले? याची कारणं दिली आहेत. यावेळी त्यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी लिहिलेला वचननामा देखील वाचून दाखवला आहे. यामध्ये देशाचं संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, शेतकरी आणि कामगारांचं हित, हिंदुत्वाचं रक्षण आणि राम मंदिराची उभारणी, गेल्या ६०-७० वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते करून दाखवण्यासाठी आपण युतीसोबत एकत्र राहू, असा वचननामा शेवाळे यांनी वाचून दाखवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या ज्या उमेदवारांना आपण हरवलं आहे, त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केल्यानं शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांमध्ये सुरुवातीपासून नाराजी होती. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत पुन्हा एकदा युती स्थापन करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तब्बल १ तास चर्चा केली होती. त्यानंतर युतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज झाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी अडचणी आल्या.
हेही वाचा- VIDEO: “अहो, रामदास कदम अजितदादांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला” सचिन खरात यांची जोरदार टीका!
एककीडे युतीसाठी चर्चा आणि दुसरीकडे भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई, यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज झाले. याबाबतचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी स्वत: आपल्याकडे केल्याचा दावा देखील शेवाळे यांनी केला. तसेच माझ्याकडून युतीसाठी प्रयत्न करून झाले आहेत, आता तुम्ही प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचंही शेवाळेंनी सांगितलं. त्यानंतर राहुल शेवाळे आणि इतर खासदार युतीसाठी प्रयत्न करत असताना, संजय राऊत यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या जात होत्या.
हेही वाचा- ‘त्या’ १२ खासदारांसंह एकनाथ शिंदेंची संयुक्त पत्रकार परिषद; भावना गवळी, राहुल शेवाळेही उपस्थित
तसेच राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार मूर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा घोषित केला. त्यामुळे खासदारांच्या मनात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर आम्ही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गारेट अल्वा चार वर्षे महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी होत्या, त्या काळात शिवसेनेला प्रचंड त्रास सहन करावा लागला, असंही शेवाळे म्हणाले.