दलित वस्तीमध्ये एक दुमजली घर, विठ्ठल-रुख्मिणी निवास. घरावर निळय़ा झेंडय़ावर पतंगाचे चित्र. पतंग हे चिन्ह एमआयएमचे. ते घर अशा व्यक्तीचे ज्याला पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्याखाली पकडलेले. तेथे ओवेसींचे छायाचित्र असणारी पाटी. ते प्रचाराला येतात. त्यांच्यावर अक्षरश: फुले उधळली जातात. हे चित्र एकीकडे. दुसऱ्या बाजूला नाराज मुस्लिम नेत्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवले जातात. शहराच्या काही भागात ‘शेर आया’ या घोषणा. मोठा जमाव आला की ‘नारा ए तकबीर’ अशी घोषणा होते. शहराच्या दुसऱ्या भागात गळय़ात गमछे घातलेले तरुण. मनगटी वेगवेगळय़ा रंगांचे दोरे. दुचाक्यांचे हॉर्न वाजत राहतात. कोणीतरी मोठय़ांदा घोषणा देतो ‘जयऽऽ भवानी’. प्रतिसादादाखल मोठा आवाज येतो ‘जयऽऽ शिवाजी’!
प्रचारादरम्यान शहरातील हे चित्र संवेदनशील माणसाला हलवून टाकणारे. रंगाची प्रतीकात्मकता राजकारणाचा पोत सांगणारी. या सर्व वातावरणात काँग्रेस एकाकी. पंजा चिन्हाची रिक्षा कधीतरी गल्लीत दिसते, तर राष्ट्रवादीचे घडय़ाळ पोस्टरवरच. प्रचाराचा असा नूर औरंगाबाद पालिका निवडणुकीचे अंतरंग उलगडविण्यास पुरेसा ठरावा.
गेल्या २८ वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व. महापालिकेच्या गंगाजळीत नेहमीचा खडखडाट. कर देण्यास नागरिक तयार नाहीत असे नाही. कर गोळा करणारी यंत्रणाच कुचकामी. निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे औरंगाबाद महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवतात. भ्रष्टाचार ही खरी समस्या आहे, ती दूर करण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही. पर्यटनाची राजधानी, मर्सििडजचे शहर असे कोणी काही म्हटले तरी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात युतीला अपयश आले. त्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणातील बहुतांश वेळ इतिहासावर खर्च करावा लागला. तसे केले नाहीतर एमआयएमची सत्ता येईल, अशी भीती दाखवत केलेला प्रचार एका बाजूला आणि दुसरीकडे भाजप-सेनेसमोर बंडखोरीचे आव्हान. ११३पकी १११ वॉर्डात मतदान होणार आहे. कारण सेनेचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. पकी २१ वॉर्डात बंडखोरी झाली. काही बडय़ा नेत्यांनी स्वत: गट चालविण्याचा चंग बांधला असल्यासारखे वातावरण आहे.
या निवडणुकीत सेनेतील वादही चव्हाटय़ावर आले. स्थानिक पातळीवर अगदी लहानशा बाबींवर लक्ष घालणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे यांना जाहीरनामा प्रकाशनाच्या पत्रकार बठकीत अवाक्षरही बोलले नाहीत. सगळा कारभार पालकमंत्री रामदास कदम यांनी हाती घेतला. नागरिकांचा रोष कमी व्हावा म्हणून नेते बदलून केलेला सेनेचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे निवडणुकीनंतर कळेल. मात्र, ज्या ६० वॉर्डात एमआयएमचे उमेदवार उभे आहेत तेथेही तेवढीच बंडखोरी आहे. त्यामुळे ही निवडणूक युती विरुद्ध त्यांचे बंडखोर आणि एमआयएम विरुद्ध त्यांचे बंडखोर अशी होण्याची शक्यता आहे. निवडणूक जिंकली तर माझ्यामुळे आणि हरलो तर खापर कोणावर फोडायचे, हे ठरवून सारी गणिते मांडली जात आहेत.
जसे शिवसेनेत, तसेच भाजपमध्ये आहे. प्रदेशाध्यक्षांनी विश्वासात घेतले नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. निवडणुकीच्या फडात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस तशी निष्प्रभ ठरेल असेच चित्र आहे, तर राष्ट्रवादीचीही दाणादाण उडेल, असाच प्रचाराचा नूर होता. कुरघोडय़ांच्या खेळात दलित-मुस्लिम हा पिचलेला समाज एक झाला तर, या भीतीने सुरू झालेले राजकारण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या समस्या जाहीरनाम्याच्या गुळगुळीत कागदावर.
मागील पक्षीय बलाबल
शिवसेना ३१ व ३ पुरस्कृत
भाजप १५
काँग्रेस १९
राष्ट्रवादी ११
शहर प्रगती आघाडी ३
भारिप-बहुजन व अपक्ष १७
शहरातील समस्या
– दर तीन दिवसांनी होणारा पाणीपुरवठा,
– कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सुविधाच नाही
– शहरभर खड्डय़ांचे साम्राज्य
– आरोग्य सुविधांचा बोजवारा
– शाळांच्या दर्जा घसरलेला
युतीविरुद्ध बंडखोर आणि एमआयएमविरुद्धही बंडखोर!
दलित वस्तीमध्ये एक दुमजली घर, विठ्ठल-रुख्मिणी निवास. घरावर निळय़ा झेंडय़ावर पतंगाचे चित्र. पतंग हे चिन्ह एमआयएमचे. ते घर अशा व्यक्तीचे ज्याला पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्याखाली पकडलेले. तेथे ओवेसींचे छायाचित्र असणारी पाटी. ते प्रचाराला येतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2015 at 01:40 IST
TOPICSएमआयएमMIMऔरंगाबाद (Aurangabad)Aurangabadनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPमहामंडळ (Corporation)Corporation
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebellious candidate against yuti and mim in aurangabad corporation election