कराड : राज्य सरकार हे गद्दार व बेईमानांचे असून, बेकायदेशीर सरकार निश्चितपणे कोसळणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या हृद्यात स्थान मिळवून राहिल्याचे गद्दारांचे खरे दुखणे असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघातील मल्हारपेठ येथे निष्ठा यात्रा आली असता शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, आदेश बांदेकर, दगडूदादा सकपाळ, नितीन बानुगडे-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, की उद्धवसाहेबांनी मागील चाळीस वर्षात मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात अशी खाती ज्यांना दिली. आशीर्वाद, प्रेम, विश्वास दिला. जनतेने मतदान दिले शिवसेनेने ज्यांना ओळख देण्याबरोबरच लायकीपेक्षा जास्तचे महत्व दिले. आणि हे सारे मिळाल्याने अपचन झाल्याने ते पलीकडे गेले आहेत. पण, हेच आज आम्ही उठाव केला असे सगळीकडे सांगत सुटलेत. तेहतीस देशांनी या गद्दरीची, बेईमानीची, निर्लज्जपणाची नोंद घेतली. ही गद्दरी शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी नसून ती माणुसकीसोबत झालेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नसतानाच्या कठीण काळात त्यांना साथ देण्याऐवजी कोणाला फोडता येईल, आपलेसे करता येईल असे घाणेरडे राजकारण झाल्याची जोरदार टीका करताना हे सारे होणे योग्य आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
राज्यातील जनतेची करोना महामारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबप्रमुखासारखी काळजी घेतली. जनतेशी सुसंवाद ठेवला. प्रचंड विकासकामे केली. सलोख्याचे वातावरण राखले. सत्तेवर येताच शिवरायांच्या राजधानीला रायगडसाठी सहाशे कोटींचा निधी दिला. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय घेतला. आणि अशा नेतृत्वाशी त्यांच्याच सहकाऱ्यांनी गद्दरी केल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. विरोधकांकडून आज महाराष्ट्र तोडण्याचे, ठाकरे कुटुंबाला एकटे पाडण्याचे कारस्थान सुरु असल्याचा आरोप करताना पण, आपल्या निष्ठा यात्रेत जनतेचे भरभरून प्रेम, ताकद व आशीर्वाद मिळत आहेत आणि हीच आमची कमाई असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.