वाई : कारखान्यामध्ये ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः २२ ते २५ मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु आज किसन वीर कारखान्याच्या ट्रॅक्टरने ४७.४५१ मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने केलेल्या कामाचे कौतुक करत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी ट्रॅक्टरने मालक अक्षय पवार व वाहन चालक संदिप दिलीप साबळे यांचा यथोचित सत्कार केला.
किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबळ झालेला होता.मागील वर्षी गाळपा अभावी शेतात ऊस उभा होता. यामुळे ऊस उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे.आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गाळप हंगाम मोठ्या उत्साहात सुरू केला. दोन्ही कारखाने सुरू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
हेही वाचा… MLC Election : नागपूरमधील भाजपाच्या पराभवानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा पराभव…”
सुरज रामदास येवले (पांडेवाडी, ता. वाई) या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस अक्षय कृष्णदेव पवार यांच्या वाहनातून आणण्यात आला. या वाहनाचे भर वजन ५६.१८० मेट्रिक टन असून निव्वळ ऊसाचे वजन ४७.४५१ मेट्रिक टन भरल्याने काट्यावर वजनच करता आले नाही व काटा लॉक झाला. किसन वीर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन भरून आल्याने या वाहन मालकाचा सत्कार कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केला. प्रमोद शिंदे यांनी वाहन मालक अक्षय पवार व वाहन चालक संदिप साबळे यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.यावेळी संचालक प्रकाश धुरगुडे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, खंडाळा कारखाना शेती अधिकारी अशोक घाडगे, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम, अरविंद नवले आदी उपस्थित होते.