सातारा जिल्ह्यातील लहान-मोठय़ा पंधरा बंधारा धरणातील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. कोयना, धोम, बलकवडी यातील पाण्याच्या साठय़ात लक्षणीय घट होत आहे. दिवसेंदिवस वाढणारे तपमान तसेच अवकाळी पावसानेही धरणात काहीच पाणीसाठा झाला नाही, याचा दाखला कमी होत असलेल्या पाण्याच्या साठय़ाने दिला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने चांगला हात दिला होता. त्यामुळे मार्च संपताना कमी होणारे पाणी एप्रिलपर्यंत पुरले होते. मात्र आता या साठय़ात घट होत आहे. कोयना धरणात सध्या वापरण्याच्या पाण्याचा २६.२४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा यात जमा केला तर हा आकडा ३१.१६ टीएमसी इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.६० टीएमसी पाणीसाठा खर्च झाल्याचे दिसून येते. तर धोम-बलकवडी ०.१९ टीएमसीने घट झाली आहे. धोम, बलकवडी, मोरणा -गुरेघर, उत्तर मांड या सर्व प्रकल्पातील २३ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे तर वांग, मराठवाड आणि मरळवाडी या मध्यम प्रकल्पात पाणी शिल्लक नाही. ही प्रकल्पातील पाणीसाठय़ाची विषमता ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर लोकांच्या तोंडचे पाणी पळवू शकते. याशिवाय दुष्काळी भागातील तलावांची पाण्याची पातळी घटली आहे. या तुलनेत उरमोडी, तारणी, कण्हेर, नागेवाडी आणि महू धरणात पाण्याची पातळी गेल्यावर्षीपेक्षा १३ टक्के जास्त आहे.
आज अखेर जिल्ह्यातील १५ धरणात असणारा पाणीसाठा खालीलप्रमाणे कोयना ३१.३६ टीएमसी, उरमोडी ७.७३, धोम ३.५९, कण्हेर ४.१५, तारळी ७.७२, धोम- बलकवडी ०.५२, नागेवाडी ०.१४, मोरणा-गुरेघर ०.३४, उत्तरमांड ०.३७, महु ०.१३, हातेघर ०.१ आणि वांग मराठवाडी धरण ०.०० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Story img Loader