रायगड जिल्ह्य़ातील मत्स्यउत्पादनात अंशत: घट झाल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. पर्शियन नेट फिशिंग, प्रदूषण आणि जादा मासेमारीचा फटका मासेमारीला बसला आहे. जिल्ह्य़ात सुरमई, पापलेट आणि जवळ्यासारख्या माशांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. तर तारली, मांदेली आणि माकूळ यांसारख्या माशाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या २०१०-११ला रायगड जिल्ह्य़ाचे मत्स्यउत्पादन ४६,९१९ टन होते. मात्र २०११-२०१२ मध्ये हे उत्पादन घटून ४६,९१२ टन झाले आहे. मत्स्यउत्पादनातील झालेली घट ही अंशत: असली तरी माशांच्या अनेक प्रजातीच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्य़ात प्रामुख्याने सुरमई, पापलेट आणि जवळा माशाच्या उत्पादनात घट झाली आहे. जिल्ह्य़ातील पापलेटचे उत्पादन ७२४ टनांवरून ४९२ टनांवर आले आहे. तर सुरमईचे उत्पादन १४८२ टनांवरून १२३३ टनांवर आले आहे. रायगड जिल्ह्य़ाच्या किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या जवळ्याचे उत्पादन १९,३१५ टनांवरून १२,२७७ टनांवर आले आहे. माकूळ आणि सौदळ्या माशाच्या उत्पादनातही घट झाली आहे.
असे असले तरी झ्िंागा, तारली, रावस आणि मांदेलीसारख्या मत्स्यप्रजातीच्या उत्पादनात वाढ झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. तारली माशाचे उत्पादन ६८७० टनांवरून १५,८६० टनांवर गेले आहे. तर मांदेलीचे उत्पादन १५५९ टनांवरून २०४८ टनांवर गेले आहे. झिंग्याचे उत्पादन ३१०० टनांवर गेले आहे. तर रावस माशाचे उत्पादन १०३ टनांवरून २३३ टनांपर्यंत वाढले आहे.
एकीकडे सुरमई आणि पापलेटसारखे मासे दुर्मीळ झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय, तर दुसरीकडे या माशांच्या किमतीत मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २००९-१० ला सुरमईची प्रतिटन १ लाख ३८ हजार उत्पन्न २०१०-२०११मध्ये प्रतिटन १ लाख ६७ हजारांपर्यंत गेले आहे. तर पापलेटचे प्रतिटन उत्पन्न १ लाख ६४ वरून २ लाख ४० हजारांपर्यंत गेले आहे. तर शेवंडाचे प्रतिटन उत्पन्न मात्र ४ लाख १७ हजारांहून ४ लाख ४२ हजारांवर गेले आहे.
मात्र वाढणाऱ्या किमतीपेक्षा घटणारे उत्पादन ही मच्छीमारांसाठी चिंतेची बाब आहे. कोकण किनारपट्टीवर वाढलेली पर्शियन नेट फिशिंग पद्धती, जादा मासेमारी, वाढते प्रदूषण आणि मासेमारी बंदीच्या काळात ट्रॉलरकडून होणारी मासेमारी यामुळे मत्स्यउत्पादन घटत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मस्त्यउत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मच्छीमारांनी व्यक्त केले आहे.
रायगडातील मत्स्यउत्पादन घटले
रायगड जिल्ह्य़ातील मत्स्यउत्पादनात अंशत: घट झाल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. पर्शियन नेट फिशिंग, प्रदूषण आणि जादा मासेमारीचा फटका मासेमारीला बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2012 at 07:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction in fish production in raigad