कराड :  कोयना धरण पाणलोटात गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानामध्ये ४४० मिलीमीटरने तर, धरणातील पाणी आवकमध्ये ३९.७१ टीएमसीने घट झाल्याचा परिणाम म्हणून कोयना जलविद्युत प्रकल्पाची ऊर्जानिर्मिती आणि सिंचनामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोयनेच्या जलसाठय़ाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, यंदा कमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने त्यातील पाणी वापराचा कटाक्ष महत्त्वाचा आहे.  कोयना धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन. पण, यंदा खरीप हंगामातही शेतीसाठी धरणातून पाणी द्यावे लागले. १ जून ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सिंचनाला ५.४६ टीएमसी व वीज निर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाणी वापर झाला आहे. कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातील असल्याने सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणामधून विसर्ग करण्यात येतो. कोयना धरणातून गतखेपेस खरीप हंगामातील पाणीवापर ०.४७ टीएमसी होता. यंदा तो २.३६ टीएमसी म्हणजेच जवळपास दोन टीएमसीने जादा झाला आहे.पाणीसाठय़ाच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामात  ११.७१ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. जलसंपदा विभाग पुण्याच्या मुख्य अभियंत्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीज निर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी मर्यादेत पाणीवापर सूचित केला आहे.

हेही वाचा >>>ठाकरेंच्या नेतृत्वावर बैठकीत शिक्कामोर्तब; सामंत, भुसे यांच्या उद्धव यांना पाठिंबा देण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या- सुनील प्रभू यांचे स्पष्टीकरण

कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ टीएमसी व १२.४१ टीएमसी असे ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. नमूद कपातीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामधील पाणी वापर ३५ टीएमसीच्या मर्यादेत आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी तीन  टीएमसी, सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर करण्याचे नियोजन आहे.जेणेकरून पिण्याच्या पाण्यासह सिंचन, ऊर्जानिर्मितीसही  आवश्यक पाणी उपलब्ध होईल तसेच येत्या जून व जुलै महिन्यात धरणामध्ये अपेक्षित पाणी आवक न झाल्यास पिण्यासह आवश्यक गरजांसाठी धरणामध्ये किमान पाणीसाठा उपलब्ध राहील असा विश्वास जलसंपदा विभागाने दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction in irrigation power generation due to low water supply in koyna amy