‘मेरी’चे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी अजूनही हालचाली नाहीत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गाळ साचल्याने गेल्या तीन दशकांमध्ये राज्यातील ६१ धरणांमधील पाणीसाठा ८.५ टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘मेरी’ या संस्थेच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. गाळ साठून दरवर्षी सिंचन क्षमतेत सरासरी ०.२५ टक्के घट होत असल्याचे लक्षात आल्याने जलसंपदा विभागासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.
पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराबरोबर दगड, वाळू आणि गाळ वाहून येतो. नदीप्रवाह जलाशयाला जेथे मिळतो, तेथे पुराच्या पाण्याचा वेग कमी झाल्याने तळाचा भरड गाळ तेथेच साठून राहतो, परंतु मातीचे बारीक कण पाण्यात मिसळलेले राहून ते हळूहळू जलाशयाच्या तळाशी बसतात. अशा साठणाऱ्या गाळामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा दरवर्षी कमी-कमी होत असतो. साधारणपणे गाळामुळे उपयुक्त साठा दरवर्षी जास्तीत जास्त १ टक्क्याने कमी होईल, असे मानले जाते. कालव्याच्या विमोचकाची पातळी ठरवताना १०० वर्षांच्या आत त्या पातळीखालचा जलाशय साठा गाळाने भरून जाणार नाही, याची काळजी घेतली जाते, पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जमीन वापर बदलल्यामुळे, तसेच वनजमिनीची टक्केवारी कमी झाल्यामुळे गाळाचे प्रमाण वाढू शकते. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) धरणांमध्ये प्रत्यक्ष आलेल्या गाळाचे सर्वेक्षण केले.
राज्यातील निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र यामधील तफावतीची तुलना करताना गाळ साठल्यामुळे सिंचन क्षमतेत दरवर्षी होणारी घट ही प्रकल्पामध्ये अपेक्षिल्याप्रमाणे बरीच कमी असल्याचे आढळून येते. बहुतेक सर्व धरणांमध्ये प्रत्यक्ष आलेल्या गाळाचे प्रमाण फार कमी असल्याचे निरीक्षण चितळे समितीच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा कमी होत चालल्याने साठलेल्या गाळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्यात धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानंतर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून गाळ काढण्याचा उपक्रम राबवण्यात येतो, पण या माध्यमातून फार कमी गाळाची उचल होते, असे निदर्शनास आले आहे. धरणातील गाळ शासकीय खर्चाने काढणे हे आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या खर्चाने गाळ घेऊन जाण्याच्या उपक्रमाला चालना दिली पाहिजे, असाही मतप्रवाह आहे. आता दूरसंवेदन तंत्राने सर्व मोठय़ा, मध्यम, तसेच काही प्रातिनिधिक लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष आलेल्या गाळाचे सर्वेक्षण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्याची सूचना करण्यात आली आहे, पण अजूनही सर्वेक्षणासाठी हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
काही धरणांमध्ये तर दूरसंवेदन तंत्राच्या माध्यमातून मोजणी करण्यात आली. ६१ धरणांचे सर्वेक्षण केल्यावर बहुतांश धरणांमधील गाळाची टक्केवारी ०.१ ते १ प्रतिवर्ष या दरम्यान असल्याचे दिसून आले. एकूण सरासरीने ३४ वर्षांच्या कालावधीत ६१ धरणांमधील पाणीसाठा ८.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. म्हणजेच, गाळ साठल्याने दरवर्षी सिंचन क्षमतेत सरासरीने ०.२५ टक्के घट होत असल्याचे निदर्शनास येते.