Reel Star Aanvi Kamdar : अलिबाग : माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल करतांना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार असे या तरुणीचे नाव असून ती व्यवसायाने सनदी लेखापाल होती. समाज माध्यमावर इन्फ्ल्यूएन्सर म्हणूनही ती नावारूपास आली होती.
अन्वी कामदार आणि तीचे सहा सहकारी वर्षा पर्यटनासाठी माणगाव मधील कुंभे येथे आले होते. एका कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असतांना अन्वीचा तोल गेला आणि ती ३०० फूट दरीत कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी याबाबतची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केले. मात्र खोल दरी असल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या.
हेही वाचा…रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणातून मुबलक पाणी साठा
कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षीत बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीच्या साह्याने ही बचाव पथके दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. तीला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले. मात्र माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सहलीचा आनंद लुटताना दाखवलेला अतिउत्साह तिच्यासाठी जीवघेणा ठरला.