Barsu Refinery Project : रत्नागिरीतील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाविरोधात पुकारलेले आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, असं काहीही घडलं नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच केला. तसंच, या प्रकल्पाला ७० टक्के लोकांचं समर्थन असल्याचंही ते म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दावा रिफायनरी विरोधक सत्यजित चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी तेथे जनमत घेण्याचंही आवाहन केलं आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकाराल चर्चेसाठी आम्ही तयार असल्याचंही सांगितलं.
सत्यजित चव्हाण म्हणाले की, “ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी भेट दिली नाही. त्याआधी जून-जुलै महिन्यात सर्वेक्षणाला आले होते. तेव्हा ते सर्वेक्षण आम्ही होऊ दिलं नाही. आता पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन सर्वेक्षण सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, कोकणातील सर्व पोलीस येथे जमले आहेत.”
“राजापुरातील पाच ग्रामपंचयातीच्या हद्दीत हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतु, ग्रामपंचायतीला कोणतंही लेटर न देता हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या काळात ४५ कार्यकर्त्यांना तालुकाबंदी करण्यात आली होती. मार्च २०२१ पासून हा प्रकल्प येथे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथे समर्थन असल्याचं पसरवलं गेलं. परंतु तशी परिस्थिती नव्हती. पाचही ग्रामसभांचे रिफायनरी विरोधातील ठराव आमच्याकडे आहेत. सर्वेक्षण करूनही ठराव केले आहेत. ७० टक्के समर्थन असल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. परंतु, तुम्ही आधार कार्ड आणि वोटिंग कार्डवर जनमत घ्या. ९० टक्क्यांवर अधिकांचा विरोध आहे”, असंही पुढे ते म्हणाले.
“आम्ही चर्चेला तयार आहोत. परंतु, ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्यावर यांनी भेटायला बोलावलं. कोकणासाठी असलेले तुमच्या धोरणात्मक निर्णयात बदल करा, असंच आम्हाला सांगायचं आहे”, असं सत्यजित चव्हाण यांनी स्पष्ट केलं.