लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. या निवडणुकीत ३० जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या. आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार हे शरद पवारांच्या पक्षात सहभागी होऊ शकतात अशी चर्चा रंगली होती. त्यावर शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं. ज्यानंतर आता आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेकजण शरद पवार गटात येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य आहे? याबाबत मला सांगता येणार नाही. मात्र, आमच्या पक्षातील जे इतर माझे सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र, याबाबत स्पष्ट असं विधान करता येणार नाही. त्यामध्ये जे इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांचं योगदान आणि भूमिका यावरून निर्णय घेतला जाईल.” असं शरद पवार म्हणाले होते.

अजित पवार गटाची शरद पवारांवर टीका

शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे दरवाजे अजित पवारांसह गेलेल्या आमदारांना उघडे आहेत. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार टीका केली. शरद पवारांनी हे म्हणणं याचाच अर्थ हा आहे की विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील काय म्हणाले?

त्यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने टीका केली आहे. शरद पवार ज्याअर्थी हे म्हणत आहेत की त्यांच्याकडे आमच्या गटातून लोक येऊ शकतात याचाच अर्थ त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत उमेदवार नाहीत. असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. याआधी रोहित पवार यांनी अजित पवार गटातले १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यावेळीही अजित पवार गटाने हा दावा फेटाळून लावला होता. तसाच तो आजही उमेश पाटील यांनी फेटाळून लावला. आमच्या पक्षातला एकही आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाही असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- शरद पवार गटात जाणार का? नरहरी झिरवळ म्हणाले, “इकडून तिकडे…”

२०२३ मध्ये पक्षात उभी फूट

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या होत्या. २०२३ मध्ये पक्षात फूट पडली. अजित पवारांसह सध्याच्या घडीला पक्षातले ४१ आमदार आहेत. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांना निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्हही सोपवलं. लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला फारसं यश मिळालं नाही. मात्र शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले. यानंतर अजित पवारांसह गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत असं शरद पवार गटाने म्हटलं होतं. या टीकेला आता उमेश पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reflects desperation ncp hits back says sharad pawar party struggling to get leaders to fight assembly polls scj