आधी केंद्रीय राज्यमंत्री आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागलेल्या रावसाहेब दानवे यांना या साठी जवळपास तीन दशकांचे अंतर कापावे लागले. मागील २५-३० वर्षांत जिल्ह्य़ाच्या राजकीय क्षेत्रात अनेक उलथापालथी झाल्या. परंतु रावसाहेबांचे महत्त्व कमी न होता उत्तरोत्तर वाढतच राहिले.
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सभापती असा प्रारंभिक राजकीय प्रवास करणाऱ्या रावसाहेबांनी पहिल्यांदा १९८५मध्ये भोकरदनमधून विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु केवळ १ हजार ५९० मतांनी पराभव झाला. त्यानंतर सतत जनतेशी संपर्क ठेवून १९९०मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर आजतागायत पराभव पाहिला नाही. दोनदा विधानसभा व चारदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या रावसाहेबांना पक्षाने महत्त्व दिले, ते गेल्या चार-पाच महिन्यांत!
लोकसभेत भाजपच्या विजयानंतर राज्यात विधानसभा निवडणूक लागली. या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील बहुजनांचा चेहरा म्हणून रावसाहेबांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बहुजनांचा चेहरा म्हणून रावसाहेबांकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आले. त्यामुळे रावसाहेबांना ही जी दोन पदे देण्यात आली, ती पक्षाची गरज म्हणून असे मानण्यास वाव आहे. नाही तर विधानसभा-लोकसभा निवडणुकीत हमखास विजयी होत आलेल्या रावसाहेबांची जिल्ह्य़ाबाहेर खरी ओळख होण्यासाठी २५ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला नसता.
विधानसभा-लोकसभा निवडणुकीत यश मिळूनही पक्षात फारसे महत्त्व मिळत नसल्याच्या काळात त्यांनी जिल्ह्य़ातील सहकार, शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात लक्ष दिले. सहकारी साखर कारखाना आणि शिक्षण संस्था उभी केली. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळविले. जिल्हा ते गावपातळीवरील राजकारणावर वर्चस्व ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. जिल्ह्य़ातील भाजपमध्ये आपल्या शब्दालाच कसे महत्त्व राहील, या साठी प्रयत्न केले.
शरद पवार यांच्यासारख्या विरोधी नेत्याशी संबंध ठेवले. दुसरीकडे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी व काँग्रेस पुढाऱ्यांशी सत्तासंघर्षही चालूच ठेवला. ग्रामीण जनतेशी सातत्याने संवाद ठेवला आणि त्याच्या बळावर अनेक निवडणुका जिंकल्या. आपल्या मुलास राष्ट्रवादीची विधानसभेची उमेदवारी देण्याच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील जुने भाजप नेते पुंडलिकराव दानवे हे शरद पवार यांच्या नजीक गेल्यानंतर भोकरदन तालुक्यात रावसाहेब दानवेच भाजपचे सर्वेसर्वा बनले! अन्नधान्य व अन्य वस्तूंचे स्वस्त धान्य दुकानांपर्यंत होणारे वितरण, ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा, रखडलेल्या आणि नवीन रस्त्यांची कामे, पथकर नाक्यावर होणारी अडवणूक, विजेची कमतरता आदी जनतेशी संबंधित बाबींमध्ये रावसाहेबांचे बारकाईने कसे लक्ष असते, हे त्यांचे समर्थक आणि विरोधकही गप्पांच्या ओघात सांगत असतात.
जनता व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ग्रामीण भाषेतून त्यांच्याशी संबंधित उदाहरणांचा आधार घेण्याची कला त्यांना अवगत आहे. निवडणूक काळात त्यांच्या वक्तृत्व शैलीस अधिकच बहर येतो. अनेकदा त्यांनी दिलेली उदाहरणे आणि कथा पटतही नाहीत, परंतु त्यापासून मिळणाऱ्या तात्कालिक आनंदास श्रोते मुकायलाही तयार नसतात. त्यांच्या भाषणातील खरे-खोटेपणा तपासण्याची तसदी घेण्यापेक्षा भाषणात न्हाऊन निघणारे श्रोते कमी नसतात! जिल्ह्य़ाच्या व तालुक्याच्या मर्यादेत हे सगळे चालत असते वा चालून घेतले जात असते. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर वावरताना हे चालेल काय, हा प्रश्न आहे. रावसाहेब या अनुषंगाने स्वत:मध्ये काही बदल करवून घेणार आहेत काय आणि असा बदल झाला तर तो कसा असेल, या विषयी आता औत्सुक्य आहे.

Story img Loader