लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. देश आणि महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीपूर्वी प्रचंड उकाड्याने सगळेच हैराण झाले होते. अशात महाराष्ट्रात वरुणराजाचं आगमन झालं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज झालं आहे. कोकणातील रत्नागिरीनंतर सोलापूर तसंच पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालची खाडी असा पाऊस सुरु झाला आहे. हवामान तज्ञ्ज के. एस. होसाळीकर यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे उकाड्याने आणि प्रचंड झळांमुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बळीराजाला मोठा दिलासा!

महाराष्ट्रात आता नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पाऊस कधी पडणार? याची चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुदतपूर्व पावसाने हलका दिलासा सगळ्यांनाच दिला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं आहे. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता.

हे पण वाचा- पावसाळा सुरु झाला की कोकणातील ‘या’ VIDEO ची आठवण येतेच; मंडळी पाहून पोट धरुन हसाल

आज आणि उद्या राज्यात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. याचा शेती पितांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव , संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या. संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत.