राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू चिंतेचा विषय बनला असून तब्बल ११५ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध कारणाने जीव गमवावा लागला तर एका आठ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. पुण्याच्या यशदा मार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन व इतर बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वातावरणाची वाणवा, आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी मरण पावल्याच्या घटना घडल्या. अनुचित घटना घडू नयेत म्हणून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, प्रथमोपचार वीज पुरवठा, शाळेभोवती संरक्षक भिंत, तार कंपांऊंड, लोखंडी प्रवेशद्वार, शाळा व वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारती अशी पॉलिश केलेली उत्तरे दिली जातात. प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या वस्तूच त्यांच्या पुढय़ात येत असल्याचे विधिमंडळ सदस्य वेळोवेळी सांगतात. कितीही कडेकोट बंदोबस्त आश्रमशाळांसाठी केला असला तरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाहिजे ते वातावरण मिळत नसल्यानेच त्यांचे मृत्यू होतात ही वस्तुस्थिती आहे.
यासंदर्भात शोभा फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता. २०११-१२ या वर्षांत शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील ११५ विद्यार्थी मरण पावले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली आहे. गोंदिया जिल्ह्य़ात आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर राज्यातील एक हजार १०८ आदिवासी आश्रमशाळेतील हलगर्जीपणाचे प्रकार समोर आले आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात, असे कितीही मंत्री सांगत असले तरी दरवर्षीच विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे.  शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी विद्यार्थी विपरित पस्थितीमुळे अगतिक होऊन आश्रमशाळेत येतात मात्र, त्याही ठिकाणी त्यांची हेळसांडच होते, त्यामुळेच त्यांच्या मृत्यू होतात.
जळगाव जिल्ह्य़ातील जामनेर तालुक्यातील केकतानिंभोरा येथील आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा निर्घृण खून विद्यार्थ्यांनीच केला. आश्रमशाळेतील दहावी व सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या विद्यार्थ्यांना जळगावच्या बाल न्यायमंडळात हजर करण्यात आल्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मनीष जैन यांच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.    

Story img Loader