जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सर्वाशी चर्चा करून तातडीने सोडविण्यात येईल, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून हा प्रकल्प जैतापूर येथेच होणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमध्ये विशेषत साखरीनाटे गावच्या मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. रत्नागिरीमध्ये भाजपप्रणीत महाराष्ट्र मुस्लीम संघाच्या वतीने रविवारी अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, कोकण युथ फेडरेशनचे अध्यक्ष फकीर महंमद ठाकूर, शब्बीर शेख, माजी आमदार बाळ माने, जैतापूर अणुउर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाचे नेते व महाराष्ट्र मुस्लीम संघाचे जिल्हाध्यक्ष अमजद बोरकर, इब्राहिम खान, जि. प. चे माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगांवकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबरोबरच जैतापूरचा प्रश्न प्रामुख्याने हाताळला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी जैतापूर येथील मच्छीमारांनी अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवू, असे स्पष्ट केल्याने प्रकल्प विरोधकांमध्ये खळबळ उडाल्याचे दिसून आले. भंडारी यांचे हे विधान अणुउर्जा प्रकल्प होणार, असेच संकेत देणारे असल्याची चर्चा मेळाव्यानंतर सुरू होती.
स्वातंत्र्यानंतर गेली ६० वष्रे काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाला फसविले. त्यांचा वापर केवळ निवडणुकीत मते देण्यापुरताच केला, अशी टीका भंडारी यांनी करताना आता या समाजाला नवीन दिशा मिळावी, परिवर्तन व्हावे, याकरिताच राज्यातील मुस्लीम समाज भाजपसोबत आलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी निगडित नाही. दहशतवाद मोडीत काढावयाचा असेल तर कायद्याचा आग्रह धरून दहशतवाद मोडू शकतो. अल्पसंख्याक समाजातील तरुणांना कौशल्यावर आधारित उद्योगातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे भंडारी म्हणाले.
प्रारंभी अमजद बोरकर यांनी प्रास्ताविकात या मेळाव्याच्या आयोजनाची माहिती दिली. या मेळाव्याला २५० जण उपस्थित होते व त्यात बहुसंख्येने साखरी नाटे (ता. राजापूर) येथील पुरुष व महिलांचा प्रामुख्याने समावेश होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा