यवतमाळ : शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन ‘नॉट रिचेबल’ आहेत, त्यात यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे व माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील या राजकीय भूकंपानंतर संजय राठोड यांचे सत्तेत पुनरागमन होऊन राजकीय पुनर्वसन होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणामुळे दीड वर्षांपूर्वी संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून संजय राठोड हे मंत्रीमंडळात सामावून घेण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. बंजारा समाजाचा पुढाकार, महतांची शिष्टाई असे सर्व प्रकार झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता राजकीय गोटात सुरू होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कधीच स्पष्टपणे काहीही सांगितले नव्हते. कदाचित पक्षप्रमुखांचे मौनच संजय राठोड यांना एकनाथ शिंदेंच्या गटात घेऊन गेले असावे, असे बोलले जात आहे. तसेही मुख्यमंत्र्यांसोबत कधीच संवाद होत नसल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. पक्षस्तरावरील संवादाच्या अभावामुळेच हे राजकीय नाट्य घडल्याची शक्यता येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.
संजय राठोड यांच्या शिवसेनेतील प्रवासात एकनाथ शिंदे हे त्यांचे नेहमीच ‘आदर्श’ राहिले आहेत. एकनाथ शिंदेंसारखे राजकारण करावे, तसे वागावे, बोलावे यासाठी राठोड कायम आग्रही असतात. त्यामुळे सुरतेच्या स्वारीवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ‘विश्वासू’ समर्थकांमध्ये संजय राठोड यांचाही समावेश आहेच, असा ठाम विश्वास राठोड यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, राठोड यांचाही भ्रमणध्वनीही ‘नॉट रिचेबल’ असल्याने ते एकनाथ शिंदेंबरोबरच असतील या शंकेला पुष्टी मिळत आहे.
संजय राठोड यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला जिल्ह्यात मोठा हादरा बसणार असून, भाजपला राठोड यांच्या समाजाच्या पाठबळामुळे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे. ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपातील काही लोकांनी आपला राजकीय बळी घेतला, असे सतत सांगणारे संजय राठोड आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळली तर भाजपच्या प्रवाहात जाऊन पवित्र होतात की, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेप्रति निष्ठा दाखवतात, हे लवकरच कळणार आहे.
यवतमाळशी संबधित तीन आमदार शिंदेंसोबत
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. स्थानिक पातळीवर पालकमंत्री भुमरे आणि संजय राठोड एका मंचावर कधीच दिसले नाहीत. मात्र एकनाथ शिंदेंसोबत राठोड आणि भुमरे आहेत. त्यांच्यासह यवतमाळचे तत्कालीन विधानपरिषद सदस्य आ. तानाजी सावंत हे सुद्धा गेल्याचे सांगण्यात येते.