अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

वायुसेनेने पाकिस्तानात दहशतवाद्यांना लक्ष्य करणारे हवाई हल्ला केला. परंतु या कारवाई संदर्भात संभ्रम निर्माण झाला असून सैन्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत छायाचित्रांसह संबंधित पुरावे प्रसिद्ध करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.

केंद्र शासनाच्या कारभारावर  टीकास्त्र सोडताना आंबेडकर म्हणाले, केवळ हल्ला करून आम्ही सज्ज आहोत, हेच दाखवायचा प्रयत्न सरकारने केला असेल तर त्याची काहीच गरज नव्हती. यापूर्वीही तसे ते दाखवून देण्यात आले आहे. हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, हे मोजण्याचे काम वायुसेनेचे नाही, असे विधान वायुदलप्रमुख धनोआ यांनी करून केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. वायुसेनेने आपले काम केले, आता सरकारने या हल्ल्यासंदर्भात जबाबदारीने पुरावे देण्याची गरज आहे, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

काँग्रेससोबतच्या आघाडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, गांधीजींच्या विचारसरणीची काँग्रेस आम्हाला हवी आहे. सध्या काँग्रेस हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत आहे. काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवार घोषित केले. त्या २२ जागा सोडून उर्वरित जागांसाठीच आता आघाडीची चर्चा होईल.

‘ट्रोल’ करणाऱ्यांना ठोकून काढा

लोकशाहीमध्ये टीका करणारा हा प्रामाणिक असावा, सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढण्याशिवाय पर्याय नसतो. मला ट्रोल करणाऱ्यांना कार्यकर्ते पाहून घेतील.  प्रसारमाध्यमांमधून माझ्यावर टीका करणाऱ्यांवर माझा राग नाही. राजकीय पाश्र्वभूमी असलेल्यांबद्दल आता ठोकशाहीची भूमिका असणार आहे. सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढा. माझा लढा समोरच्या हुकूमशहासोबत आहे. त्यामुळे काही बाबतीत मला सुद्धा हुकूमशहासारखे वागावे लागेल, असा असा  इशाराही आंबेडकर यांनी दिला.

Story img Loader