समाजाच्या हितासाठी धर्म व राजकारण वेगळे झाले पाहिजे, त्याशिवाय काही चांगले घडणार नाही. सर्व धर्मामधील चांगल्या गोष्टी एकत्र करण्याची गरज असून त्यातून निश्चितपणे चांगले परिणाम साध्य होतील, असे मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
‘बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ते ‘धर्मसुधारणा आणि आजची आव्हाने’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर आणि बिशप थॉमस डाबरे यांनीही या परिसंवादात आपले विचार मांडले. ‘बहुतेक राष्ट्रे एकधर्मी तर आपण बहुधर्मी आहोत. जात, धर्म या गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध तसेच संमतीशिवाय होत असतात. आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी समानतेची हवी. माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म होय. सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्र केल्यास चांगले परिणाम साधले जातील,’ असे डॉ. सप्तर्षी म्हणाले. प्रा. बेन्नूर म्हणाले की, बहुतेक सर्व धर्माची निर्मिती होऊन आज शेकडो वर्षे उलटली आहेत. या धर्माची तत्वे, नियम, आचारविचार तयार होऊनही तेवढीच वर्षे उलटली. या मधल्या काळात या साऱ्यांमध्ये अनिष्ठ रूढींचाही शिरकाव झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. चिरंतन सत्य सोडून अचरण तत्वे महत्वाची ठरू लागली आहेत. याला कुराणही अपवाद नाही. यातूनच मग धर्मगुरूंचे महत्व वाढले. मग अशा वेळी ही मंडळी सांगतील तोच धर्म अशी समाजाची धारणा होते. याचा या धर्मसुधारणेच्या कार्याला मोठा फटका बसत आहे.
जागतिकीकरणामुळे निर्माण झालेला साम्राज्यवाद आणि धर्माध हिंसक शक्ती हे दोन प्रमुख अडथळे असून या चळवळीपुढे उभे आहेत. जगभर या दोन शक्तींनी हैदोस घातला आहे. मुस्लिम जगात तर ही गोष्ट खूप प्रामुख्याने दिसत आहे. अमेरिकेने  सौदी अरेबिया, पाकिस्तान अशा देशांना हाताशी धरून सुन्नी मुसलमानांचे अतिरेक्यांमध्ये रूपांतर केले आहे. अराजक निर्माण करायचे आणि त्यातून साम्राज्यवाद पोसायचा हेच अमेरिकेचे अनेक ठिकाणी धोरण आहे. हिंदू धर्म हा सहिष्णूतावादी, सर्वसमावेशक, अहिंसक म्हणून ओळखला जात होता. पण या धर्मातही उजव्या धर्माध शक्तीचा शिरकाव झाला आहे, असे ते म्हणाले.
बिशप डाबरे यांनी दहशतवाद आणि धार्मिक असहिष्णुता ही धर्म सुधारणेपुढील दोन महत्त्वाची आव्हाने असल्याचे सांगितले. ते म्हणाले, धर्माच्या नावाने राजकारण होऊ नये. धर्मग्रंथांचा नव्याने अर्थ लावणे आवश्यक आहे. धर्माने पोथीपुराणात अडकून पडू नये. धर्माच्या प्रेरणेने सामाजिक सुधारणा व्हाव्यात. धार्मिक दंगलींचे कोणत्याही पातळीवर समर्थन करता येणार नाही. शेकडो वर्षांपूर्वी तयार झालेल्या धर्मात कालपरत्वे बदल झाले पाहिजेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा