सावंतवाडी : कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यातील हेब्री तालुक्यामध्ये गर्द वनराईत असलेल्या तिंगळे या गावी ‘धर्म-कला-साहित्या’चा जागर नुकताच पार पडला. यावेळी मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे  श्रीमंत खेम सावंत भोसले यांची खास उपस्थिती होती. या महोत्सव तिंगळे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तिंगळे विक्रमार्जुन हेग्गडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत दिमाखदार व वैभवसंपन्न वातावरणात आयोजित केला होता. या महोत्सवात दैवाराधना, यक्षगानाचे सादरीकरण तसेच साहित्यिक चर्चा असलेल्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले होते.

गतवर्षी ११ मे रोजी सावंतवाडी राजवाड्याच्या पटांगणावर राजघराण्याच्या सन्माननीय व्यक्तिंच्या उपस्थितीत रंगलेला उडुपीच्या कानडी कलाकारांनी मराठी संवाद आणि गीतांसह सादर केलेला यक्षगानाचा खेळ सावंतवाडीकर रसिकांनी पाहिला होता. त्यावेळी श्रीमंत भोसले यांनी त्या खेळाचा घेतलेला आनंद व त्यासाठी घेतलेली मेहनत त्या यक्षगानमंडळीचे प्रमुख गुरू संजीव सुवर्णा यांनी पाहिली होती.

शिवाय नित्यनेमाने गेली तीन वर्षे राजवाड्याच्या परिसरात होत असलेला कोकणातील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य व वैभव असलेल्या ‘दशावतार’ खेळांचा महोत्सव ते राबवित असल्याची माहिती गुरू संजीव सुवर्णा यांना होती. असे कला व साहित्याला प्रोत्साहन देणारे, गुणीजनांचा गौरव करणारे व्यक्तिमत्व म्हणून ही मंडळी श्री भोसले यांना ओळखत होती. त्यामुळेच उडु‌पीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले होते.

यातुनच दोन भिन्न प्रदेश, भिन्न भाषा, सगळीच नसली तरी काहीशी भिन्न संस्कृती असूनदेखील महाराष्ट्र-कर्नाटकातली माणसे अधिक जोडली गेली, सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.त्यादिवशी चंडे, तुतारी, सनई व चौधडे यांच्या शेषात श्री भोसले यांचे तिंगळे येथील आगमनानंतर केलेले स्वागत अभूतपूर्व होते. साडेतीनशे वर्षांहूनही अधिक काळ एक स्वतंत्र संस्थान म्हणून आपली उज्वल परंपरा आणि वैशिष्ट्य राखलेल्या सावंतवाडी संस्थानाचे राजे म्हणून पाहायला रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय लोटला होता. श्रीमंत खेम सावंत भोसले त्यांच्या या स्वागताचा अत्यंत समर्पक शब्दात उल्लेख करीत महाराष्ट्र-कर्नाटक अनुबंधाविषयी विस्तृत असे विवेचन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

गेली चौसष्ट वर्षे असा हा सोहळा होत असतांना सुप्रसिध्द साहित्यिक कलावंत डॉ. कोटा शिवराम कारंत, मैसुरचे महाराज अशा अनेक मंडळींनी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले आहे. आता यात आपल्या सावंतवाडी संस्थानाचाही उल्लेख केला जाईल.त्या कार्यक्रमात व्यासपीठावरून उडुपीच्या जवळील कार्कळ येथील एक अभ्यासक श्रीकांत शेट्टी यांनी थोडक्यात सावंतवाडी व सावंतवाडी संस्थानाचा इतिहास विशद केला. त्यातून कर्नाटकातील सागरकिनाऱ्यावरील उडुपी मंगळुरू या भागात सावंतवाडी आणि त्या अनुषंगाने इथली माणसे यांचा परिचय उपस्थित जनसमुदयाला झाला.

या समारंभाला गौरव अतिथी म्हणून सावंतवाडीचे प्रा. विजय फातर्पेकर तर विशेष अतिथी म्हणून अॅड. शामराव सावंत यांना आमंत्रित केले होते. प्रा. फातर्पेकर यांनी भाषा-कला आणि साहित्य याच्या माध्यमातून महाराष्ट्र-कर्नाटक यामधील अनुबंध कसा घट्ट होत जातो याविषयी विवेचन केले. तसेच सिंधुदुर्गातील स्वतंत्र, प्राचीन व स्वतःचे वेगळे अस्तित्व असलेल्या ‘दशावतार’ खेळांविषयी सांगितले. २००६ साली डॉ. कारंतांच्या जन्मदिनी आमचा मराठी ‘दशावतार’ उडुपी इथे आम्ही केला होता हे नमूद करतांनाच त्या खेळाला उडुपीच्या रसिक प्रेक्षकांनी कसा छान प्रतिसाद दिला होता याचीही आठवण दिली.